संसदेच्या कामकाजात आजही गदारोळ झाला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांच्या एका वक्तव्यामुळे राज्यसभेत मोठा गोंधळ झाला. शिक्षण मंत्रालयाच्या कामकाजावर राज्यसभेत चर्चा सुरु असताना हा सर्व प्रकार घडला
ही चर्चा सुरु होण्यापूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं की आम्ही चर्चा करण्यासाठी तयारी करुन आलोय आणि.... त्यानंतर भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतल. खरगेंनी अध्यक्षांच्या पीठाचा अपमान केला आहे. खरगेंनी यावर माफी मागावी आणि हे असंसदीय शब्द सभागृहाच्या कामकाजातून हटवावे, अशी मागणी नड्डा यांनी केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
खरगेंनी मागितली माफी
काँग्रेस अध्यक्षांनी त्यावर सांगितलं की, त्यांच्या वक्तव्यामुळे अध्यक्षांच्या पीठाला धक्का बसला असेल तर मी माफी मागतो. त्यांनी सांगितलं की, मी अध्यक्षांच्या विरोधात नाही तर सरकारच्या विरोधात बोललो होते. त्यावेळी उपसभापती हरिवंश अध्यक्षांच्या आसनावर होते. त्यांनी हे असंसदीय शब्द कामकाजातून काढण्याचे निर्देश दिले.
ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी शिक्षण मंत्रालयावर चर्चेची मागणी केली होती. उपसभापती हरिवंश यांनी दिग्विजय सिंह यांचे नाव उच्चारताच गोंधळ सुरु झाला. उपसभापतींनी खासदारांना शांत करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. त्यानंतरही गोंधळ सुरुच होता.
यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे उभे राहिले. ते म्हणाले आज सकाळपासून शिक्षण मंत्री आलेले नाहीत. ही हुकुमशाही झाली आहे का? मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की आम्हाला बोलू द्यावं आम्ही बोलण्यासाठी तयार आहोत. त्यावेळी काँग्रेस अध्यक्षांनी एक असा शब्द वापरला की त्यामुळे संसदेत गोंधळ सुरु झाला.
( नक्की वाचा : Rahul Gandhi : 'काँग्रेसमधील काही जण भाजपासाठी काम करतात', राहुल गांधींचा खळबळजनक आरोप )
खरगेंसारख्या अनुभवी व्यक्तींनी हे शब्द वापरणे दुर्दैवी असल्याचं जेपी नड्डा यांनी सांगितलं. त्यानंतर विरोधी पक्षाकडूनही गोंधळ सुरु होता. खरगे यांची भाषा योग्य नसून त्यांनी माफी मागावी अशी मागणी नड्डा यांनी केली. त्यानंतर खरगे यांनी सभागृहात माफी मागितली.