गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यानं पेट घेतला आहे. अनेक ठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात आंदोलनं सुरु आहेत. अशातच आता मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वयक रमेश केरे पाटलांनी आरक्षणासाठी वेगळं आंदोलन उभं केलं आहे. केरे पाटलांचे आंदोलन आमचे आंदोलन नाही असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे एका आरक्षणासाठी दोन वेगवेळी आंदोलने आता मराठा समाजातून होताना दिसत आहेत. त्यामुळे आरक्षणावरून मराठ्यांमध्ये दोन गट पडले आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलनं सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वयक रमेश केरे पाटील यांनी मुंबईत जवाब दो आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्याबाहेर केरे पाटलांनी आंदोलनाची तयारी केली होती. मात्र त्यांची गाडी गिरगाव चौपाटीजवळ अडवण्यात आली. रमेश केरे पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. फडणवीसांनी मराठा आरक्षणासंदर्भात भाजपची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केरे पाटल यांनी केलीय. सगळे राजकीय पक्ष फक्त मराठा समाजाला झुलवायचं काम करताय. पण ठोस भूमिका कुणीही घेत नाही अशी प्रतिक्रिया केरे पाटलांनी दिलीय.
केरे पाटलांनी मुंबईत केलेल्या आंदोलनावर मनोज जरांगे पाटील यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे. आमचं राज्यात कुठेही आंदोलन सुरु नाही असं सांगत केरे पाटलांच्या आंदोलनापासून हात झटकले आहे. त्यामुळे मराठा समाजामध्ये फूट पडली आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. अशा जरांगे आणि केरे पाटलांची आंदोलनं ही मात्र वेगवेगळी होत आहेत. अशात केरे पाटलांचे आंदोलन कोणाच्या सांगण्यावरून झालं आहे असं जरांगे म्हणत आहे. शिवाय फडणवीसांनी मराठेच मराठ्यांच्या अंगावर सोडले आहेत असा मोठा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे.
ट्रेंडिंग बातमी - Sheikh Hasina शेख हसीनांना भारत मदत करणार की नाही ? परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले...
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केरे पाटील आणि आंदोलकांना फडणवीसांनी सागर बंगल्यावर चर्चेसाठी बोलावलं होतं. ते भेट घेऊन आल्यानंतर जरांगेंच्या वक्तव्यावर केरे पाटलांनी प्रत्युत्तर दिलंय. मी जी मागणी करत आहे ती अखंड मराठा समाजासाठी करत आहे. जरांगे पाटील जे सांगत आहे की ओबीसी मधून आरक्षण हवे अशीच मागणी आम्ही करत आहोत. जरांगे पाटील यांच्या प्रत्येक आंदोलनात आम्ही सहभागी असू. जरांगे यांच्याप्रमाणे आम्ही पण आरक्षणासाठी मागणी करत आहोत असे रमेश केरे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.