बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्दावरून सुरू झालेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. बांगलादेशातील परिस्थिती हाताबाहेर गेल्याने आणि आंदोलक राजीनाम्याच्या मागणीवरून दिवसेंदिवस आक्रमक होत गेल्याने शेख हसीना यांनी पंतप्रधान पद सोडले आणि सोबतच बांगलादेशही सोडला.शेख हसीना या भारतात दाखल झाल्या असून त्यांना भारत मदत करणार का ? असा प्रश्न विचारला जात होता. परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी या प्रश्नाला उत्तर दिले आहे.
शेख हसीना सोमवारी रात्री बांग्लादेशच्या वायुसेनेचे विमान C-130 ने भारतामध्ये पोहोचल्या होत्या. भारतातून त्या लंडनला जाणार असल्याची माहिती मिळते आहे. हसीना भारतात दाखल झाल्यानंतर पंतप्रधानांनी सोमवारी रात्री एक बैठक बोलावली होती. या बैठकीपूर्वी परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी पंतप्रधानांना बांगलादेशातील परिस्थितीबद्दल माहिती दिली होती. या बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल या बैठकीला उपस्थित होते.
मंगळवारी बांगलादेशातील परिस्थितीबाबत सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला देखील परराष्ट्रमंत्र्यांनी परिस्थितीबद्दलची माहिती दिली. सर्वपक्षीय बैठकीनंतर बोलताना काँग्रेस खासदार पी.चिदंबरम यांनी म्हटले की, राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आणि राष्ट्रीय हितासाठी सर्व मतभेद दूर सारून काँग्रेस पक्ष सरकारच्या पाठीशी उभा राहील. या बैठकीला महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेदेखील उपस्थित होत्या. परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की शेख हसीना यांना भारताकडून जी मदत लागेल ती करण्यासाठी भारत तयार आहे. बांगलादेशात भारताचे 10 हजार विद्यार्थी अडकले असून त्यांच्या सुरक्षेसाठी बांगलादेशच्या सैन्यासोबत भारत सरकार सातत्याने संपर्क साधत आहे असेही जयशंकर यांनी सांगितले. शेख हसीना यांना भविष्यात काय करायचे आहे याचा निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ हवा असून तोपर्यंत भारत त्यांना सर्वतोपरी मदत करेल असे जयशंकर यांनी सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world