मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झाले आहेत. ते सध्या शांतता रॅली काढत आहे. कोल्हापुरातही त्यांनी मराठा समाजाला संबोधित केले आहे. त्याच वेळी मनसे नेते राज ठाकरे यांचाही मराठवाडा दौरा सुरू आहे. या दौऱ्या दरम्यान मराठा आंदोलकांनी राज ठाकरे यांच्या विरोधात निदर्शने केली आहेत. याबाबत जरांगे यांना विचारलं असता, कोणत्याही नेत्याला मराठा आंदोलकांनी अडवू नका. राज्यात आपलं आंदोलन सध्या सुरू नाही. जर कोणाला जाब विचारायचा असेल तर मुंबईला जाऊन त्यांची गचांडी धरून जाब विचारू, एवढी ताकद मराठा समाजाची आहे असे त्यांनी वक्तव्य केले आहे. यावरून मुंबईत येवून जाब विचारणार असल्याचा एक प्रकारे इशाराच सर्व पक्षाच्या नेत्यांना दिला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मराठा समाजाला राजकारणात यायचं नाही. पण तुम्ही कोणताही पर्याय ठेवलाच नाही तर समाजाचा नाईलाज होईल असं त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं. जे आम्हाला सहकार्य करणार नाहीत त्यांना आम्ही पाडू असा इशाराही या निमित्तांनी त्यांनी दिला आहे. गरिब ओबीसींचा मराठ्यांना पाठिंबा आहे असेही ते म्हणाले. सध्या राजकीय पक्षांच्या यात्रा सुरू आहेत. या सर्व यात्रा त्यांच्या स्वार्थासाठी आहेत. त्यांना त्यांचे पक्ष मोठे करायचे आहेत. पण मराठा काय आहे हे 29 तारखेला आंतरवालीत दिसेल असेही त्यांनी सांगितले.
ट्रेंडिंग बातमी - सुपारी आंदोलन! 'होय ते आमचेच शिवसैनिक पण...' संजय राऊतांनी हात का झटकले?
मराठा आरक्षणाच्या विरोधात जे बोलती त्यांना आपण सोडणार नाही. राज्यातला विरोधी पक्ष किमान आरक्षणाच्या विरोधात तरी बोलत नाही. पण सत्ताधारी मात्र थेट उलट बोलत आहेत असा आरोपही जरांगे पाटील यांनी यावेळी केला. मराठा आरक्षणासाठी सलग एक वर्ष आंदोलन सुरू आहे. ते आजही तेवढ्याच तिव्रतेने सुरू आहे. त्यामुळे सरकारच्या पोटात दुखत आहे. माझ्या मागे कोण आहे? आंदोलनाला पैसा कोण पुरवत आहे? यावर सरकार नजर ठेवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
( ट्रेंडिंग बातमी : Vinod Kambli : 'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर विनोद कांबळी पहिल्यांदा दिसला, तब्येतीबाबत म्हणाला... )
आपल्याला राजकारणात पडायचं नाही. तसं असतं तर आपण कधीच खासदार झालो असतो असेही जरांगे म्हणाले. सध्या आपल्यावर बोलण्यासाठी राणे आणि दरेकरांना सांगितलं गेलं आहे. मला एकटं पाडण्यासाठी सरकारचे षडयंत्र आहे. राजकारणात काही डाव खेळावे लागतात. ते डाव या राजकारण्यांनीच मला आता शिकवले आहेत. असं सांगत कोणाला पाडायचं आहे हे आमचं ठरलं आहे. दरम्यान कोल्हापुरकरांना 29 ऑगस्टला अंतरवाली सरटी येथे येण्याचं आवाहन त्यांनी केलं. मराठा समाजाच्यावतीने उमेदवार उभे करायचे की जे आरक्षण देणार नाहीत त्यांचे उमेदवार पाडायचे, याचा फैसला अंतरवाली सराटी येथील सभेत घेण्यात येणार आहे. त्यासाठी कोल्हापूरकरांनी या सभेला मोठ्या संख्येने यावे, असे आवाहन जरांगे-पाटील यांनी केले.