मुंब्र्यात एका मराठी तरुणाने तिथल्या फळविक्रेत्याला मराठी बोलण्याचा आग्रह केला. 'महाराष्ट्रात राहता तर मराठी बोलता येत नाही का?'अशी विचारणाही केली. या भागत बहुतांशी मुस्लिम दुकानदार व्यापारी आहे. मराठी बोलायला सांगितलं म्हणून त्या फळविक्रेत्याला राग आला. त्याने अजूबाजूच्या लोकांना बोलावलं. त्या तरुणाला सर्वांनी घेरलं. ऐवढच नाही तर मराठी बोलायला का सांगतो अशी विचारणा करत त्यालाच हिंदीतून माफी मागायला लावली. त्याचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या बाबत मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विचारले असता, त्यांनी दिलेली प्रतिक्रिया सर्वांच्याच भूवया उंचावणारी आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला आहे. अशा वेळी तिच भाषा बोला असा आग्रह धरणाऱ्या तरूणाला मुंब्र्यातील लोकांच्या दादागिरीचा सामना करावा लागला. याच्या प्रतिक्रियाही उमटल्या आहेत. याबाबत भाष्य करताना स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सपशेल हात वर केले आहेत. हा वाद लहान मुलांच्यात झालेला वाद आहे. त्याला भाषिक जातीय रंग देऊ नका अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. याबाबत आपण पोलिसांना सांगितले आहे, दोघांना बोलावून घ्या. त्यांची समजूत काढा. जे घडल ते चुकीचं आहे. तुम्ही जबरदस्ती कोणालाही करू शकत नाही. मराठी बोलायला लावणं, हे देखील चुकीचं आहे. शिवाय हिंदी बोलायला लावणं हे ही तेवढच चुकीचं आहे असंही ते म्हणाले. या प्रकरणात आपण काही बोलणार नाही असंही ते म्हणाले.
विशाल गवळी या मराठी तरुणाला मराठी बोलण्याचा आग्रह केला म्हणून मुंब्र्यातील लोकांनी दादागिरी करत माफी मागायला भाग पाडलं. हा तरुण मुंब्रामध्ये फळ विकत घेत असताना हा प्रकार घडला. त्यानंतरच्या वादावादीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओनुसार विशालनं फळं विकत घेत असताना समोरच्या व्यक्तीला 'महाराष्ट्रात राहता तर मराठी बोलता येत नाही का?' असं विचारलं. त्यानं हे विचारताच तो फळ विक्रेता संतापला. मुंब्रामधील अन्य नागरिकांनी देखील त्याला साथ दिली. मला मराठी येत नाही, मी हिंदीमध्येच बोलणार असं हा फळविक्रेता बोलल्याचा आरोप आहे. इतर फळ विक्रेते आणि स्थानिक रहिवाशांनी मराठी तरुणाला घेरले.
अखेर वाढत्या जमावापुढे विशालला कान पकडून सर्वांची माफी मागणे भाग पडले. माझ्या बोलण्यानं कुणी दुखावलं असेल तर माफी मागतो, असं विशालनं सांगितलं. पण, या सर्व प्रकरणात विशाल गवळी या मराठी तरुणावरच पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यानंतर स्थानिक आमदार असलेल्या जितेंद्र आव्हाडांनी या प्रकार लहान मुलांमधला होता असं सांगत त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.