जाहिरात

Devendra Fadnavis: कलंक ते टरबूजा म्हणून हिणवले, तेच विरोधक फडणवीसांच्या प्रेमात का पडले?

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या आग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांवर कौतूकाचा वर्षाव करण्यात आला आहे.

Devendra Fadnavis: कलंक ते टरबूजा म्हणून हिणवले, तेच विरोधक फडणवीसांच्या प्रेमात का पडले?
मुंबई:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांनी खालच्या पातळीची टीका केली होती. कोणी त्यांना महाराष्ट्रावरील कलंक म्हटले होते तर कोणी त्यांना टरबूजा म्हणून हिणवलं होतं. पण या टीकांकडे लक्ष न देता फडणवीसांनी राज्यात आपले पाय आणखी घट्ट रोवले आहेत. त्यांनी थेट मुख्यमंत्रिपदाला गवसणी घातली. मुख्यमंत्रिपदाचा कारभार सांभाळल्यानंतर त्यांनी कामाचा धडाका लावला आहे. त्यामुळे त्यांचे विरोधकही त्यांचे आता कौतूक करत आहे. कौतूक करणारे दुसरे तिसरे कोणी नाहीत तर ज्यांनी या आधी फडणवीसांना हिणवलं होतं, खालच्या पातळीवरची टीका केली होती तेच आता त्यांचे कौतूक करण्यात आघाडीवर आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पडद्यामागे काही सुरू आहे की काय याची चर्चाही सुरू झाली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

'सामना' च्या आग्रलेखातून कौतूक 

शिवसेना ठाकरे गट आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातले संबध प्रचंड ताणले गेले होते. 2014 पासूनच त्यात अंतर आलं होतं. त्या वेळी पासून अगदी कालपर्यंत शिवसेना ठाकरे गटाकडून देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष केलं जात होतं. त्यांच्यावर केली जाणारी टीकाही खालच्या पातळीवरची होती. शिवसेनेच्या जेष्ठ नेत्यांनीही टरबूजा म्हणून फडणवीसांना हिणवलं होतं. पण आता चक्क शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या आग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांवर कौतूकाचा वर्षाव करण्यात आला आहे. शिवाय फडणवीस जर चांगलं काम करत असतील तर त्यांचे कौतूक का करू नये असा प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. जर राज्याच्या भल्याचे निर्णय होणार असतील तर सर्व वैर बाजूला ठेवून कौतूक करणं ही परंपरा आहे असं ही ते म्हणाले.   

ट्रेंडिंग बातमी - Crime news: बँकेच्या वसूली एजंटचा धुमाकूळ, हफ्ता भरला नाही म्हणून शेतकऱ्यावर तलवारीने हल्ला

आग्रलेखात नक्की काय? 

‘नक्षलवाद्यांचा जिल्हा' याऐवजी गडचिरोलीला ‘पोलाद सिटी' ही नवीन ओळख  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिळवून देणार असतील तर त्याचे स्वागत करायला हवे. असं सामनात म्हटलं आहे. गडचिरोली हा महाराष्ट्राचा शेवटचा नव्हे तर पहिला जिल्हा म्हणून ओळखला जावा. यासाठी फडणवीस प्रयत्न करणार आहेत. ते चुकीचे नाही. फक्त गडचिरोलीच्या विकासाचा हा ‘विडा' आपण तेथील सामान्य जनता आणि गरीब आदिवासी यांच्यासाठीच उचलला आहे. कोणा खाणसम्राटांसाठी नाही. हे दाखवून देण्याची काळजी देवाभाऊंना घ्यावी लागेल. तरच नवीन वर्षाच्या सूर्योदयापासून गडचिरोलीच्या परिवर्तनाची सुरुवात झाली आहे. हा त्यांचा वादा खरा होईल. बीडमध्ये बंदुकीचे राज्य कायम असले तरी गडचिरोलीत संविधानाचे राज्य येत असेल तर मुख्यमंत्री फडणवीस कौतुकास पात्र आहेत असं या आग्रलेखात म्हटलं आहे. 

ट्रेंडिंग बातमी - EVM हॅक करून दाखवा, माझी प्रॉपर्टी घेऊन जा! भाजप नेत्याचे चॅलेंज कोण स्वीकारणार ?

सुप्रिया सुळेंनी ही केलं फडणवीसांचे कौतूक 

शिवसेना ठाकरे गटाने फडणवीसांचे कौतूक केलं असताना दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ही देवेंद्र फडणवीस यांचे कौतूक केले आहे. त्या पुण्यात बोलत होत्या. राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत आपण फडणवीसांना पत्र लिहीणार आहोत. अनेक मंत्री हे चांगलं खातं मिळालं नाही म्हणून नाराज आहे. तर काहींनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतरही कार्यभार स्विकारलेला नाही. सर्वत्र नाराजी नाट्य सुरू आहे. अशा वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकटेच सरकारमध्ये अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. ते एकटेच काम करत आहेत. त्यामुळे त्यांचे कौतूक करायला हवं असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. सरकारमध्ये एकच माणूस अॅक्शन मोडमध्ये आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीस असंही त्या म्हणाल्या. 

ट्रेंडिंग बातमी - Delhi Elections : भाजपला दिल्लीचा गड भेदता येणार? या सहा गोष्टी अजेंड्यावर, विधानसभेसाठी काय आहे प्लान?

विरोधकांचा सुर बदलला 

देवेंद्र फडणवीसांवर याच विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. पण राजकारणात सर्व काही कायम स्वरुपी नसतं याचा प्रत्यय आता आला. जे टीका करत होते तेच आता फडणवीसांचे गोडवे गात आहेत. हे बदलतं राजकारण महाराष्ट्राला कोणत्या दिशेने नेणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. एकीकडे शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येणार अशी चर्चा आहे. त्यात  शिवसेना ठाकरे गटही पुन्हा एकदा भाजप जवळ जाण्याची संधी शोधत आहे, अशी चर्चा सध्या जोरात होत आहे. त्याचीच सुरूवात म्हणून की काय फडणवीसांबरोबर जुळवून घेण्याची रणनिती विरोधकांनी आखली तर नाही ना असं ही बोललं जात आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com