बिहार विधानसभा निवडणुकीच्या मैदानात सिंघमची एन्ट्री झाली आहे. बिहारच्या निवडणुकीत हा नवा खिलाडी मानला जात आहे. गुन्हेगारांचा कर्दनकाळ अशी ओळख असणाऱ्या पोलीस अधिकारी शिवदीप लांडेंनी नव्या मैदानात एन्ट्री केलीय. महाराष्ट्रातले शिवदीप लांडे बिहारमधल्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. शिवदीप लांडे यांनी हिंद सेना या पक्षाची स्थापना केली असून त्यांच्या पक्षाचं चिन्ह आहे शंकराच्या पिंडीवरचं त्रिपुंड. त्यांनी बिहार विधानसभेच्या सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बिहार निवडणुकीतला हा मराठी चेहरा चर्चेचा विषय ठरला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शिवदीप लांडेंनी 18 वर्ष खाकी वर्दीत देशसेवा केली आहे. पोलीस विभागात एकमेकांना जय हिंद म्हटलं जायचं. त्यावरुनच शिवदीप लांडेंनी पक्षाचं नाव हिंद सेना ठरवलं आहे. शिवदीप लांडे बिहारमधल्या सगळ्या 243 जागांवर हिंद सेनेचे उमेदवार उतरवणार आहेत. शिवदीप लांडे हे मूळचे महाराष्ट्रातले आहेत. लांडे यांचा जन्म अकोल्यामधला आहे. 2006 च्या बॅचचे ते आयपीएस अधिकारी आहेत. बिहारमधल्या नक्षल प्रभावित मुंगेर जिल्ह्यात त्यांना पहिलं पोस्टिंग मिळालं होते. तिथपासूनच सुपरकॉप अशी त्यांची ओळख झाली.
कडक शिस्तीच्या लांडेंनी पटना,पूर्णिया,अररिया आणि मुंगेरमध्ये गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली होती. गेल्या वर्षी शिवदीप लांडेंनी भारतीय पोलीस सेवेचा राजीनामा दिला होता. त्यानंतर शिवदीप लांडे राजकारणात एन्ट्री करतील, अशी चर्चा होती. बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये तरुण हा फॅक्टर सगळ्यात महत्त्वाचा राहणार आहे. म्हणूनच शिवदीप लांडे बिहारच्या राजकारणात तरुणांचा आवाज होऊन उतरणार आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये 7 कोटी 80 लाख मतदार आहेत. यामध्ये 30 ते 39 वयोगटातले 2 कोटी 04 लाख मतदार आहेत.
बिहारमध्ये तरुणांसाठी रोजगार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. यंदा बिहारच्या निवडणुकीत कसलेले आरजेडी, जेडीयू, भाजप, काँग्रेस यांच्यासह प्रशांत किशोर यांची जनसुराज पार्टी आणि शिवदीप लांडेंची हिंद सेना हे नवे खेळाडू आहेत. यापैकी आरजेडी, प्रशांत किशोर यांची पार्टी आणि शिवदीप लांडेंचा पक्ष तरुणांवर डाव खेळणार आहेत. अशा परिस्थितीत बिहारमध्ये एक चतुर्थांश असलेली तरुणांची मतं या तीन पक्षांमध्ये विभागली जातील, असा अंदाज आहे. शिवदीप लांडे आणि प्रशांत किशोर यांच्या पार्ट्यांमुळे कुणाचं नुकसान होणार, हे पाहणं आत उत्सुकतेचं आहे. मात्र एक मराठी चेहरा बिहारी तरूणांचा आवाज होण्याचा प्रयत्न करत आहे हे मात्र नक्की.