पालकमंत्रिपदावरुन महायुतीत अजूनही धुसफूस आणि नाराजी नाट्या सुरू आहे. पालकमंत्रिपद मिळालं पण हवं त्या जिल्ह्याचं मिळालं नसल्यामुळे मंत्री नाराज आहेत. तर मंत्री असूनही पालकमंत्री होता आलं नाही म्हणून काही मंत्री नाराज आहेत. त्यामुळे महायुतीत सर्व गोंधळाचं वातावरण पाहायला मिळत आहे. प्रजासत्ताक दिन असल्याने सर्व पालकमंत्री त्या त्या जिल्ह्यात गेले होते. या निमित्ताने हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ ही जिल्ह्यात आले होते. त्यांची ही पहिलीच भेट होती. यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्याने नवा वाद मात्र निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
नरहरी झिरवळ हे पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच हिंगोलीत आले होते. त्यामुळे त्यांचं थाटामाटात औक्षण झालं. हिंगोलीच्या जनतेनं प्रेमानं पालकमंत्र्यांचा सत्कारही केला. मात्र या सत्कारानंतर पालकमंत्र्यांनी हिंगोलीला काय दिलं? याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. पालकमंत्री नरहरी झिरवळांनी सत्काराच्या बदल्यात हिंगोलीचा चक्क अपमान केला, असं बोललं जात आहे. झिरवळांनी हिंगोलीला गरीब जिल्हा म्हणून हिणवलं आहे. एवढंच नाही तर गरिबाला गरीब जिल्हा का दिला? असा प्रश्न त्यांनीच उपस्थित केला आहे.
शिवाय मुंबईत गेल्यावर याबाबतचा जाब ही आपण मुंबईत गेल्यावर विचारणार आहोत असंही ते म्हणाले आहे. त्यामुळे पालकमंत्रिपदावरून महायुतीत मोठ्या प्रमाणात नाराजी आहे हे पुन्हा एकदा समोर आले आहे. झिरवळांनी जाहीर पणे केलेले हे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काही पटलेलं नाही. अशा पद्धतीने झिरवाळ यांनी वक्तव्य करणं योग्य नाही असं अजित पवार म्हणाले आहे. तर भाजपनंही झिरवळांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केलीय. काहीतरी बोलून असंतोष निर्माण करायचा हे योग्य नाही असं गिरीष महाजन म्हणाले.
पालकमंत्री जाहीर झाल्यापासूनच अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. रायगड आणि नाशिक पालकमंत्रिपदावरुन वाद आहेच. आता राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांनीही दूरचा जिल्हा दिल्यानं अजित पवारांकडे नाराजी व्यक्त केलीय. कोल्हापूरच्या हसन मुश्रीफांना 625 किलोमीटर लांब वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळालं आहे. नाशिकच्या माणिकराव कोकाटेंना 195 किलोमीटरवरचा नंदुरबार जिल्हा मिळालाय. साताऱ्याच्या मकरंद पाटील यांना 440 किलोमीटर लांब असलेला बुलढाणा जिल्हा देण्यात आलाय. नाशिकच्या नरहरी झिरवळांना 445 किलोमीटरवरचा हिंगोली जिल्हा दिला गेलाय. लातूरच्या बाबासाहेब पाटलांना 636 किलोमीटरवरचा गोंदिया जिल्हा देण्यात आलाय.
संबंधित जिल्ह्याचा विकास व्हावा म्हणून पालकमंत्रीपदं दिली जातात. मंत्री हे संपूर्ण राज्याचे असतात त्यामुळे गरीब, श्रीमंत असा भेदभाव करणं मंत्र्यांना शोभत नाही, अशी प्रतिक्रीया आता हिंगोलीत उमटत आहे. एखाद्या जिल्ह्याला गरीब म्हणण्यापेक्षा मंत्र्यांनी त्या जिल्ह्याचा विकास करायला हवा, असं हिंगोलीकर आता झिरवाळांच्या वक्तव्यानंतर बोलत आहेत. झिरवळांनाही हे समजेल, अशी अपेक्षा आता हिंगोलीकर व्यक्त करेत आहेत.