मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. अंतरवाली सराटीत ते 25 जानेवारीपासून उपोषणाला बसले आहेत. ते उपोषणाला बसल्यापासून त्यांच्यावर भाजप नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. त्यात जालन्याच्या नव्याने पालकमंत्री झालेल्या पंकजा मुंडे जरांगेंबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रजासत्ताक दिना निमित्त त्या जालन्यात आल्या होत्या. त्यावेळी जरांगेंच्या उपोषणाबाबत त्यांना विचारण्यात आलं. शिवाय जरांगेंची तुम्ही सरकारचे प्रतिनिधी म्हणून भेट घेणार का? असा प्रश्नही त्यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाचा फटका लोकसभेला महायुतीला बसला होता. जालन्यात रावसाहेब दानवे तर बीडमध्ये पंकजा मुंडे यांचाही पराभव झाला होता. या पराभवा मागे मनोज जरांगे पाटील असल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत मात्र मराठा आंदोलनाचा काही एक परिणाम दिसून आला नाही. पंकजा मुंडे या आता मंत्री झाल्या आहेत. विशेष म्हणजे जरांगे ज्या जालना जिल्ह्यातील आहेत त्या जिल्ह्याच्या त्या पालकमंत्री ही आहेत.
अशा स्थितीत जरांगेंच्या उपोषणाला पंकजा मुंडे किती प्रतिसाद देतात याची चर्चा सुरू झाली आहे. त्याबाबत त्यांना विचारलं असता, मनोज जरांगे हे त्यांचा लढा लढत आहेत. त्यांच्या बद्दल आपल्याला सन्मान आहे. संविधानाच्या चौकटीत राहून त्यांच्या लढ्याला न्याय मिळावा अशी आपल्याला अपेक्षा आहे. मी जिल्ह्यात पहिल्यांदाच आले आहे. ते सध्या उपोषणाला बसले आहे. त्यांनी चर्चेची तयारी दाखववी तर आपलीही चर्चा करण्याची तयारी आहे.
मात्र ही चर्चा करताना तिथे गेल्यावर तिथंलं वातावरण नियंत्रणात ठेवणं ही त्यांची जबाबदारी आहे. मी तसा निरोप त्यांना पाठवणार आहे. शिवाय त्यांच्या निरोपाची प्रतिक्षाही करणार आहे असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांनी जरांगे पाटील यांना भेटण्याची तयारी दाखवली आहे. पण दुसरीकडे तिथे काही तरी गडबड होवू शकते यांची अप्रत्यक्ष भितीही व्यक्त केली आहे. त्यामुळे आता चेंडू हा मनोज जरांगे पाटील यांच्या कोर्टात आहे. त्यामुळे ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकीकडे मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील आणि समाज आक्रमक आहे. तर दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणात वातावरण तापले आहेत. या प्रकरणात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर ही टीका होत आहे. अशा स्थितीत पंकजा मुंडे जरांगेंच्या भेटीला अंतरवाली सराटीत गेल्या तर काय होईल याची हीचर्चा सुरू झाली आहे. शिवाय पोलीस प्रशासनावर ही त्याचा ताण पडेल असं ही बोललं जात आहे. त्यामुळे या दोघांची भेट होणार की नाही याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world