राज ठाकरे यांच्या समर्थकांकडून भाषिक वादामुळे अमराठी भाषिकांना मारहाण केली जात आहे. त्यात मनसेला लाजवेल असा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये मनसेच्या नेत्याचा मुलगा दारूच्या नशेत, अर्धवट नग्न अवस्थेत कारमध्ये बसून मुंबईतील प्रसिद्ध मराठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि अभिनेत्री राजश्री मोरे यांच्याशी गैरवर्तन करताना दिसत आहे. मनसेचे राज्य उपाध्यक्ष जावेद शेख यांचा हा मुलगा आहे. त्याचे नाव राहिल शेख असे आहे. आपल्या वडीलांच्या पदाचा रूबाब तो दाखवत असल्याचं यात दिसत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
त्याच्या विरोधात आता महिलांचा विनयभंग आणि निष्काळजीपणे गाडी चालवल्याच्या आरोपाखाली अंबोली पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शिवाय राहिलला अटक करण्यात आली आहे. हा व्हिडिओ शूट करणाऱ्या राजश्री मोरे या महिलेने तो त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पुन्हा पोस्ट करताना शिवसेना नेते संजय निरुपम यांनी मनसेवर टीका केली आहे. मराठी संस्कृतीचे रक्षणकर्ते असल्याचा दावा करणाऱ्यांचा हा 'खरा चेहरा' असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
प्रकरण नेमके काय आहे?
राखी सावंतची मैत्रीण असलेल्या राजश्री मोरे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ती सांगते 'डोक्यावर बंदूक ठेवून मराठी बोलायला लावू नका. जर मुंबईतून परप्रांतीय लोक गेले तर काय करावे लागेल, ते समजेल! कारण जे ते करू शकतात, ते करण्याची मराठ्यांमध्ये ताकद नाही! मराठ्यांना आधी मेहनत करायला शिकवा, मग लोकांना मराठी शिकवा.' असा तो व्हिडीओ आहे. त्यांच्या या व्हिडिओमुळे मनसे कार्यकर्ते संतापले होते. त्यांनी अभिनेत्रीविरोधात मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसां समोर राजश्री हीने माफी ही मागितली होती. पुढे तो व्हिडिओ डिलीट करण्यात आला.
राजश्रीसोबत जोरदार वाद
पण प्रकरण इथेच थांबले नाही. राजश्रीने आणखी एक व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. या व्हिडिओमध्ये राहिल जावेद शेख याने तिच्या कारला धडक दिली. धडक दिल्यानंतर राहिल आपल्या गाडीतून बाहेर आला. त्यानंतर राजश्रीसोबत त्याचा जोरदार वाद झाला. राजश्रीला जावेदने शिवीगाळ केल्याचेही ऐकू येत आहे. घटनेच्या वेळी जावेदने दारू प्यायली होती असा राजश्रीचा दावा आहे. राजश्रीचा हाच व्हिडिओ निरुपम यांनी शेअर केला आहे.
निरुपमने व्हिडिओ शेअर केला
संजय निरुपम यांनी त्यांच्या 'एक्स' अकाउंटवर या घटनेचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. निरुपम यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, 'नशेत धुंद. अर्धवट नग्न. एका मराठी भाषिक महिलेसोबत शिवीगाळ करणारा मनसे नेत्याचा मुलगा. वरून आपल्या बापाचा रुबाब दाखवत आहे. मराठी स्वाभिमानाचे रक्षण करण्याचा दावा करणाऱ्यांचा खरा चेहरा पाहा. याच मुस्लिमांच्या दबावाखाली मनसेवाले हिंदूंवर हल्ले करत आहेत का?' असं निरूपम यांनी या व्हिडीओतून विचारलं आहे.
मनसेने हात झटकले
या संपूर्ण प्रकरणातून मनसेने आता स्वतःला बाजूला केले आहे. पक्षाचे नेते अविनाश जाधव यांनी म्हटले आहे की, राहिल शेखचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी कोणताही संबंध नाही. जावेद शेख आमचे मनसे पदाधिकारी आहेत. त्यांचा मुलगा मनसेमध्ये कोणत्याही पदावर नाही. तो मनसेचा प्राथमिक सदस्यही नाही. त्याने जे काही केले आहे, त्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना समर्थन करत नाही. आम्ही मागणी करतो की पोलिसांनी कायद्यातील तरतुदींनुसार त्याच्यावर योग्य कारवाई करावी. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या प्रकरणाचे समर्थन करत नाही.