
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. मात्र या अधिवेशनात देखील विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. महाविकास आघाडीला ते मिळावं अशी अपेक्षा आहे. मात्र ते अद्याप ही विधानसभा अध्यक्ष यांनी दिलेलं नाही. वारंवार पत्र देऊन देखील अध्यक्ष विरोधी पक्षनेतेपद विरोधकांना देत नसल्याची भावना मविआमध्ये आहे. त्यासाठी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विधानसभेत आक्रमक होणार आहे. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी विधानसभेत आक्रमक व्हा असे आदेश दिले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पक्षातील आमदारांची बैठक घेतली. विरोधी पक्षनेतापद अजून ठाकरे गटाला का मिळालं नाही याची चर्चा झाली. त्याबद्दल सभागृहात प्रश्न का उपस्थित केले जात नाहीत? असा प्रश्न त्यांनी सर्वांसमोर उपस्थित केला. याआधी शिवसेनेचे आमदार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात जावून पत्रव्यवहार करायचे. मात्र उद्यापासून त्यांच्या दालनात न जाता सभागृहात सर्व आमदारांनी या विषयी आवाज उठवावा असं ठाकरे यांनी सागितलं.
त्यामुळे आता थेट सभागृहात अध्यक्षांना जाब विचारला जाणार आहे. तशी रणनिती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं केली आहे. जर सभागृहात थेट अध्यक्षांना विचारलं तर ते थेट पाटलावर ठेवलं जाईल. या उद्देशाने उद्धव ठाकरे यांनी या सूचना दिल्या आहेत. दरम्यान यावेळी अधिवेशनात आमदारांच्या कामगिरीचा आढावा ही यावेळी उद्धव ठाकरे यांनी घेतला. रोज सकाळी विरोधी पक्षाचं विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन होतं. पण ते ज्या पद्धतीनं व्हायला पाहीजे ते होत नाही याबाबतही उद्धव यांनी नाराजी व्यक्त केल्याचं समजत आहे.
गेल्या काही दिवसांपासून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हातावर मोजण्या इतके विरोधक आंदोलन करत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार या आंदोलनास उपस्थित का राहत नाहीत असा देखील सवाल उद्धव ठाकरेंनी या बैठकीत उपस्थित केला. उद्यापासून सर्व आमदारांना आंदोलनास उपस्थित राहून विरोधकांचे प्रश्न कठोरपणे मांडण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या आहेत. या बैठकीनंतर शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांचे नवे रूप सभागृहात आणि सभागृहा बाहेर बघायला मिळेल असं बोललं जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world