राकेश गुडेकर
भाजपने वेगवेगळ्या पक्षातल्या नेत्यांना आपल्याकडे ओढण्याचा सपाटा लावला आहे. राज्यभरातून हे नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. आता कोकणातील एक बडा नेता भाजपच्या गळाला लागला आहे. हा नेते भाजपमध्ये प्रवेश करेल असे सुरूवाती पासून वाटत होते. मात्र त्याची आता अधिकृत घोषणा केली आहेत. मनसेमधून बडतर्फ करण्यात आलेले नेते वैभव खेडेकर हे आता भाजपवासी होणार आहेत. त्यांच्या पक्ष प्रवेशाची घोषणा मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. येत्या 4 तारखेला खेडेकर हे मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेश करणार आहेत अशी माहिती नितेश राणे यांनी दिली आहे.
यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राणे म्हणाले की कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आणि मतदार संघातील कामं करण्यासाठी वैभव खेडेकर आपल्याला भेटत होते. त्यांनी मनसे वाढवण्यासाठी मोठी मेहनत घेतली. त्यांच्या या मेहनतीला बळ मिळावं ही त्यांची अपेक्षा होता. पण ती फोल ठरली. त्यांच्याबरोबर जे घडलं ते त्यांनाही कदाचित अपेक्षित नव्हतं. अतिशय प्रामाणिकपणे ते पक्षाचे काम करत होते असं ही राणे यावेळी म्हणाले.
मनसेमधून त्यांची हाकालपट्टी करण्यात आली. त्यांना त्याबाबतचं पत्र देण्यात आलं. ते पत्र त्यांना मिळाल्यावर मी त्यांना फोन करून आम्ही तुमच्या बरोबर आहोत हे सांगितलं. भाजपमध्ये येण्याचा विचार करावा हे ही आपण त्यांना सांगितल्याचं नितेश राणे यावेळी म्हणाले. याबाबत आपण प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याशीही बोललो. या सर्व पार्श्वभूमीवर रविंद्र चव्हाण आणि वैभव खेडेकर यांची भेटही झाली असं राणे यांनी स्पष्ट केलं.
त्यामुळे आता वैभव खेडेकर हे 4 सप्टेंबर रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत असंही नितेश राणे यांनी सांगितलं. मुंबईत नरिमन पॉईंट कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. यावेळी त्यांच्या बरोबर मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, संतोष नलावडे आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. भाजपचा एक कार्यकर्ता म्हणून प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांचा संदेश घेऊन मी इथे आलो आहे असं राणे यांनी पत्रकार परिषदेच्या शेवटी सांगितले. वैभव खेडेकरांवर निश्चित जबाबदारी दिली जाईल. शिवाय पक्ष त्यांना ताकदही देईल असं राणे यावेळी म्हणाले.