मनोज सातवी
नालासोपारा पूर्वेला तुळींज येथील मदर वेलंकनी एज्युकेशन ट्रस्टची शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय आहे. या ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज जोरदार राडा घातला आहे. दहावी उत्तीर्ण झालेल्या मुलांना शाळा सोडल्याचा दाखला दिला जात नसल्याचा आरोप काही पालकांनी केला होता. त्याचा जाब विचारण्यासाठी मनसे कार्यकर्ते शाळेत गेले. त्यावेळी हा राडा झाला. त्याचे व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मनसेचे कार्यकर्ते यावेळी शाळेच्या आवारात शिरले होते. त्यावेळी त्यांच्या बरोबर मोठ्या प्रमाणात महिला कार्यकर्त्या ही होत्या. त्यावेळी शाळेच्या कर्मचार्यांनी बाहेरून आलेल्या लोकांना काठीने हाकलून द्या असे सांगितले. त्यामुळे मनसे कार्यकर्ते संतप्त झाले. दाखले न देता विद्यार्थ्यांची अडवणूक केली जाते असा आरोप पालकांनी केला. त्यावरून मनसे कार्यकर्ते आणि शाळेच्या व्यवस्थापनात वाद झाला.
संस्थेच्या संचालिका आशा डिसोजा या त्यांच्या केबिनमध्ये बसल्या होत्या. त्यांच्या केबिनच्या बाहेर मनसैनिक जमले होते. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला. या गोंधळामुळे केबिनमध्ये असलेल्या डिसोजा मॅडम बाहेर आला. त्यांनी हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर त्यांना संताप अनावर झाला. आधी त्यांनी जो हा सर्व प्रकार रेकॉर्ड करत होता त्याच्या मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. शिवाय तुम्हाला हा अधिकार कुणी दिला अशी विचारणा त्यांनी केली. त्याच वेळी एका महिला मनसैनिकानी त्यांच्या झिंज्या ओढल्या.
त्या हल्ल्यात डिसोजा मॅडम खाली कोसळल्या. त्यांनी स्वत:ला सावरत त्या पुन्हा उभ्या राहील्या. त्यानंतर रागाने त्यांनी चप्पल हातात घेत महिला मनसैनिकावर भिरकावली. पुरूष पदाधिकाऱ्याचा स्कार्प ओढून फेकून दिला. त्यामुळे मनसैनिक संपातले. त्यांनी डिसोजा मॅडमना घेरले. त्यानंतर त्यांना चोप देण्यात आला. कुणी कानाखाली तर कुणी झिंज्या ओढल्या. त्यामुळे शाळेत एकच गोंधळ निर्माण झाला. काही कर्मचाऱ्यांनी यात मध्यस्थी करत डिसोजा मॅडमची मनसैनिकांच्या तावडीतून सुटका केली. त्यांना पुन्हा केबिनमध्ये पाठवले. यामुळे शाळा परिसरात तणाव निर्माण झाला. काही वेळातच तुळींज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.