अशोक चव्हणा यांनी दिड वर्षापूर्वी काँग्रेस सोडली. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना राज्यसभेत पाठवण्यात आलं. मात्र मंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली नाही. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांच्या भाजप प्रवेशाचा काही एक फायदा झाला नाही. उलट नांदेडमधून काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. विशेष म्हणजे काही महिन्यातच या ठिकाणी पोट निवडणूक ही झाली. त्यातही चव्हाणांना झटका लागला. काँग्रेसच्याच उमेदवाराने हा मतदार संघ राखला. काँग्रेस सोडल्यानंतर अशोक चव्हाणांचा काँग्रेस आणि नेत्यांशी दुरावा निर्माण झाला होता. आता ते पुन्हा एकदा तब्बल दिड वर्षानंतर काँग्रेसच्या व्यासपीठावर दिसले आहेत.
नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांच्या पहील्या पुण्यतिथीचे निमित्त होते. त्यावेळी त्यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि स्मृती सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्यासोबत भाजपा नेते अशोक चव्हाण एकाच व्यासपीठावर आले होते. या कार्यक्रमाला अशोक चव्हाण यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी काँगेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार छत्रपती शाहू महाराज, माजी मंत्री अमीत देशमुख, माजी मंत्री विश्वजीत कदम, खासदार शोभा बच्छाव यांची उपस्थिती होती. यावेळी आपल्या जुन्या सहकाऱ्यां बरोबर अशोक चव्हाण दिसले.
नक्की वाचा - Pune News: पुण्याच्या 'या' डॉक्टरांचे चाहते झाले आनंद महिंद्रा, कारण ही आहे खास
काँग्रेस सोडुन भाजपात प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच अशोक चव्हाण आपल्या जुन्या सहकार्यांसोबत एकत्र दिसले. यावेळी त्यांनी आपल्या जुन्या सहकाऱ्यांशी हस्तांदोलन केले. शिवाय संवाद देखील साधला. यावेळी अशोक चव्हण यांना आपल्या भावना ही व्यक्त केल्या. ते म्हणाले हा विषय काँग्रेस नेत्यांचा नाही. दिवंगत वसंत चव्हाण यांच्या स्मृतीचा कार्यक्रम आहे. त्यांचे आणि आमचे जुने संबंध आहेत. वसंत चव्हाण माझे जुने सहकारी आहेत असं अशोक चव्हाण म्हणाले. शिवाय पक्षाच्या पलीकडे काही संबंध असतात. सगळ्या पक्षाचे नेते इथे आहेत. चव्हाण कुटुंबाने आमंत्रण दिले म्हणून मी आलो असं अशोक चव्हाण म्हणाले.
दरम्यान यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर ही आपली प्रतिक्रीया दिली. हा विषय समजदारीने सोडवण्यासाठी सरकारचे सहकार्य आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सहकार्य केले, तर सरकार हा विषय व्यवस्थित हाताळेल. सरकारची भूमिका दोन्हीकडून आहे. त्यांनी प्रतिसाद द्यावा असं अशोक चव्हाण म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांनी सरकार बरोबर चर्चा करणे गरजेचे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. चर्चेतूनच मार्ग निघेल असं ही त्यांनी यावेळी सांगितलं. पण चव्हाण काँग्रेसच्या व्यासपीठावर दिसले याचीच जास्त चर्चा नांदेडमध्ये रंगली होती.