- हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
- शेतकऱ्यांची फसवणूक, कर्जमाफी न देण्याबाबत विरोधकांची सरकारवर जोरदार टीका
- विरोधक सत्ताधाऱ्यांना अधिवेशनात कोंडीत पकडणार
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षांनी सरकार विरोधात कडक भूमीका घेतली आहे. शिवाय सरकारने निमंत्रित केलेल्या चहापानावर ही बहिष्कार घातला आहे. हे सरकार विरोधी पक्षनेतेपद रिक्त ठेवत आहे आणि दुसरीकडे विरोधकांना चहापानासाठी निमंत्रित करत आहे. या सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. कर्ज माफीच्या नावाने मतं घेतली पण कर्जमाफी देण्यास टाळाटाळ करत आहे. अशा सरकारच्या चहापानाला जाणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे विरोधी पक्ष या चहापानावर बहिष्कार टाक असल्याचं काँग्रेसनेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी सांगितलं. नागपूर इथं झालेल्या विरोधकांच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना या सरकारने वाऱ्यावर सोडलं आहे. 38.5 % शेतकरी एकट्या महाराष्ट्रात आत्महत्या करत आहेत. महाराष्ट्रात या वर्षभरात जवळपास 1238 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. सरकारमध्ये तिनही पक्ष भांडत आहेत. त्यांचे कोणाकडे लक्ष नाही. शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार हे शेतकऱ्यांना फुकटे बोलले होते. तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी तर कळस केलाय. पदोपदी शेतकऱ्यांचा या सरकारने अवमान केला आहे असा हल्ला बोल विजय वडेट्टीवार यांनी केला.
हे महायुती सरकार नतद्रष्ट आहे. त्यामुळे त्यांच्या चहापानावर आम्ही बहिष्कार घालत आहोत असं ही वडेट्टीवार यांनी जाहीर केलं. यावेळीही शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी ही सरकारवर हल्लाबोल केला. विरोधी पक्ष नेता ही दोन्ही पद रिक्त ठेवायची असं या सरकारचे सुरू आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार कायद्यात विधिमंडळात विरोधी पक्षनेता असणे बंधनकारक आहे. पुरेसे संख्याबळ नसताना विरोधी पक्षनेता नेमता येत नाही, हा निर्णय चुकीचा आहे असं ही ते म्हणाले. याबाबत आमच्याकडे पुरावे आहेत, ज्यामध्ये सदस्य संख्य ही विरोधी पक्षाच्या निवडीसाठी असणे बंधनकारक नाही असं ही ते म्हणाले.
1936साली स्थापन झालेल्या विधीमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदा असे घडत आहे. या सरकारकडे पाशवी बहुमत आहे. ऐवढे बहुमत असताना सरकार विरोधी पक्षनेता देत नाही. कारण सरकार आम्हाला घाबरत आहे. या सरकारची पापं मोठी आहेत.या सरकारकडे एकमत नाही. राज्याचे मंत्रिमंडळातील प्रत्येक मंत्री त्या त्या खात्याचे कंत्राटदार झाले आहेत अशी टिका ही जाधव यांनी यावेळी केली. त्यांच्यामध्ये शर्यत लागली आहे की कोण जास्त पैसा कमावतो. त्यामुळे आम्ही संख्येने कमी असलो तरी या सरकारची पाप मोठी आहेत. आपली अनेक पाप बाहेर येतील आणि ती येऊ नये यासाठी विरोधी पक्षनेता नेमत नाहीत असा आरोपही जाधव यांनी यावेळी केला.
संविधानाचा अपमान आणि लोकशाहीची थट्टा मांडणाऱ्या या सरकारच्या चहापनाच्या कार्यक्रमाला आम्ही का जायचे असा प्रश्न येतो. शक्ती कायदा अजूनही अमंलात आला नाही. महाराष्ट्र ड्रग्डमध्ये एक नंबरवर पोहचला आहे. लाडकी बहीण आता खड्ड्य़ात गेली आहे. आता लाडका कंत्राटदार पुढे आला आहे. मेळघाट नवजात बालकांचा मृत्यू मोठ्या प्रमाणात होत आहे. सामाजिक न्याय विभागामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा होत आहे. वैदकीय क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात औषध घोटाळा होत आहे. राज्य पूर्ण अधोगतीकडे जात आहे. राज्यात भ्रष्टाचार वाढत आहे. असे हे घोटाळेबाज सरकार महाराष्ट्रात असेल तर आम्ही त्यांच्या चहापाण्यासाठी जाणार नाही असं स्पष्ट केलं. दरम्यान विरोधक सत्ताधाऱ्यां विषयी आक्रमक झाले आहे. त्यामुळे ऐन थंडीत विरोधक सत्ताधाऱ्यांना घाम फोडण्याच्या तयारीत आहेत.