बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत क्रुरपद्धतीने केली, याची गृहखात्याकडे माहिती नव्हती का? असा संपप्त सवाल करत मुख्यमंत्र्यांनी ही माहिती लपवली. आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची माहिती सभागृहाला न देता थेट प्रसार माध्यमांना दिली, हा सभागृहाचा अपमान आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर हक्कभंग आणू, असा इशारा ज्येष्ठ काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी ही माहिती सभागृहात द्यायला पाहीजे होती असं काँग्रेसचे म्हणणे आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी प्रोटोकाल सोडून अजित पवार यांच्या शासकीय बंगल्यावर जाऊन रात्री चर्चा केली. त्यातून धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला. सरकारला या प्रकरणाची सर्व माहिती होती. पण त्यांनी ती लपवली. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही मुख्यमंत्री फडणवीस यांनी खोटी माहिती देऊन सभागृह व जनतेची दिशाभूल केली असा आरोप नाना पटोले यांनी केला. सरपंच हत्येमध्ये वाल्मिक कराड व त्याचे सहकारी आरोपी आहेत. पण सरकारने या प्रकरणातील माहिती लपवल्याने त्यांनाही सहआरोपी केले पाहिजे, अशी मागणी सभागृहात करु असे नाना पटोले म्हणाले.
(नक्की वाचा- संतोष देशमुखांच्या हत्येचे अंगावर काटा आणणारे फोटो आले समोर, मन होईल सून्न)
औरंगजेबाच्या मुद्द्यावर बोलताना पटोले म्हणाले की, सभागृह चालवणे ही सरकारची जबाबदारी आहे पण तेच बहुमताच्या जोरावर गोंधळ घालून सभागृह बंद पाडत आहेत, ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल प्रशांत कोरटकरने अपशब्द वापरून महाराजांचा अपमान केला त्याच्यावर सरकार कडून काहीच बोलले जात नाही. महाराजांचा अपमान करणारे काही जण मंत्रिम़ंडळातही आहेत. जर कोणी महापुरुषांचा अपमान करत असेल तर त्याचे समर्थन कसे करता. त्याच्यावर कारवाई केली पाहिजे, असेही नाना पटोले म्हणाले.
(नक्की वाचा- विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गटाकडून नाव निश्चित, आदित्य नाही तर 'या' नेत्यावर शिक्कामोर्तब)
विरोधी पक्षाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात आक्रमक भूमीका घेतली आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आहे. त्यामुळे महायुती सरकार बॅकफूटवर आहे. तर विरोधक मात्र आक्रमक आहे. धनंजय मुंडेंना आता सहआरोपी करावे अशी मागणी ही होत आहे. मुंडेंनंतर आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा नंबर असल्याची चर्चा आहे. शिवाय योगेश कदम यांच्या ही राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यामुळे विरोधकांनी या अधिवेशनात धमाकेदार सुरूवात केली आहे.