शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. या निमित्ताने शिवसेनेचे माजी नेते नारायण राणे यांनी आपली आदरांजली वाहीली आहे. यावेळी ते भावुक झाल्याचे दिसून आले. साहेबांच्या पार्थिवाचे दर्शनही माझ्या नशिबात असू नये ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी खंत आहे. अशा शब्दात आपल्या भावना नारायण राणे यांनी व्यक्त केल्या आहेत. त्यांनी आपलं आत्मचरित्र झंझावात यात ही हित गोष्ट लिहीली आहे. त्याचा उल्लेख त्यांनी पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या जयंती निमित्ताने केला आहे. याबाबत एक पोस्ट राणे यांनी सोशल मीडियावर केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
नारायण राणे यांनी शिवसेनाला जय महाराष्ट्र केले. त्यानंतर शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात अंतर निर्माण झाले. बाळासाहेब हयात असताना राणे यांनी केलेल्या या कृती मुळे ते संतापले होते. पण बाळासाहेबांचा आपल्यावर कधीही राग नव्हता असं राणे नेहमी सांगत आले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यामुळे आपण शिवसेना सोडली असं राणे नेहमी सांगत आले आहेत. बाळासाहेबांना आपण शिवसेनेत हवे होतो असंही ते सांगतात. पण नाईलाजाने शिवसेना सोडवी लागली असं राणेंचं म्हणणं आहे. शिवसेना सोडल्यानंतर राणे यांनी सतत उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली पण बाळासाहेबांबद्दल ते कधी ही काही बोलले नाहीत.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त नारायण राणे यांनी एक ट्वीट केले आहे. त्या ते म्हणतात. आज साहेबांची जयंती. साहेबांची आठवण नाही असा एकही दिवस जात नाही. त्यांचे माझ्या जीवनातील स्थान अढळ आहे. साहेबांच्यापुण्यस्मरणासाठी मी माझे आत्मचरित्र झंझावात मधील एक उतारा इथं देत आहे. असं राणे यांनी लिहीलं आहे. त्यात ते पुढे लिहीतात. साहेबांच्या पार्थिवाचे दर्शनही माझ्या नशिबात असू नये ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी खंत आहे.असा उल्लेख त्यांनी केला आहे. बाळासाहेबांचे निधन झाले त्यावेळी राणे हे काँग्रेसमध्ये होते. शिवाय ते मंत्रीही होते. त्यावेळी राणेंवर शिवसैनिकांचा प्रचंड राग होता. असा स्थितीत त्यांना बाळासाहेबांचे अंत्यदर्शन घेता आले नव्हते.
पुढे ते लिहीतात साहेब आणि माँ साहेब माझ्यासाठी सर्वस्व होते. साहेबांच्या निधनाने माझ्या मनातला एक कोपरा निष्प्राण झाला. आजही मला विचाराल की या जगातली माझी सर्वात प्रिय व्यक्ती कोण आहे, तर मी बेधडकपणे बाळासाहेब ठाकरे हेच एक नाव घेईन. ते माझ्यासाठी माझं जग होते आणि रहातीलही. माझ्या आयुष्यात कितीही चढउतार येऊ देत. मी आज जो कोणी आहे त्यामागे त्यांचाच आशिर्वाद आहे. हे मी आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. असंही राणे यांनी लिहीलं आहे.