राज्यात गुटखा व पान मसालाजन्य पदार्थाची वाहतूक व विक्री होत आहे. त्याला जबाबदार असलेल्या व्यक्तीविरुद्ध मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करता येऊ शकेल का, याबाबत विधी व न्याय विभागाकडे प्रस्ताव पाठवून मार्गदर्शन घेतले जाणार आहे. अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले. ते विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. आमदार श्रीकांत भारतीय यांनी राज्यात गुटखा बंदी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जावी, यासंदर्भात प्रश्न विचारला होता. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य प्रवीण दरेकर यांनी उपप्रश्न विचारले. त्याल उत्तर देताना झिरवाळ यांनी ही माहिती दिली.
प्रश्नोत्तराच्या सत्रात उत्तर देताना मंत्री झिरवाळ यांनी सांगितले की, सध्याचा जो कायदा आहे, तो वर्षभरासाठीच लागू केला जातो. ही 2012 पासून चालत आलेली प्रथा आहे. मात्र यामध्ये आता बदल करण्याची वेळ आली असल्याचेही त्यांनी सांगितले. मंत्री झिरवाळ यांनी यावेळी राज्यभरात आतापर्यंत झालेल्या कारवायांची माहिती दिली. यात 450 कोटींचा मुद्देमाल जप्त आणि 10 हजार पेक्षा अधिक गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे सांगितले.
नक्की वाचा - Awhad vs Padalkar: विधानभवनात आव्हाड-पडळकरांचे कार्यकर्ते भिडले, जोरदार राडा
यावेळी झिरवाळ यांनी सांगितले की, अन्न व औषध प्रशासन विभागात मनुष्यबळाची कमतरता आहे. ही विभागाची एक मोठी अडचण आहे. मात्र, आता नव्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच ही अडचण दूर होईल असं ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. नवे कर्मचारी आल्यानंतर मोठ्या प्रमाणात गुटखा बंदी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे शक्य होईल असं त्यांनी सांगितलं.
नक्की वाचा - Vidhan Bhavan Rada: विधानभवनात राडा करणारा ऋषिकेश टकले कोण? काय आहे राजकीय पार्श्वभूमी?
राज्यात विशेषतः सीमावर्ती भागांमध्ये काही ठिकाणी कॅन्सरजन्य पदार्थांचे सेवन वाढत असल्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. दहिसर, मुलुंड, मालाड यांसारख्या परिसरात चौकशी अधिकाऱ्यांची नेमणूक करून संबंधित गुटखा विक्रीसंदर्भात तपासणी केली जाईल असं ही त्यांनी सांगितलं. शिवाय दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासही ही झिरवाळ यांनी या प्रश्नाला उत्तर देताना दिले आहे.