
विधानभवनात आमदार जितेंद्र आव्हाड आणि गोपिचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. दोन्ही गटात हाणामारी झाली. यावेळी ज्या कार्यकर्त्याने मारहाण केली त्याचे नाव आता समोर आले आहे. त्याचे नाव ऋषिके टकले असं आहे. तो मुळचा सांगली जिल्ह्यातील पलूसचा आहे. तो भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांचा समर्थक म्हणून ओळखला जातो. तो अधिवेशनासाठी पडळकर यांच्याबरोबरच मुंबईत आला होता.
ऋषिकेश टकले याची हिंदुस्तान शिव मल्हार संघटना आहे. या संघटनेचा तो सांगली जिल्हा अध्यक्ष आहे. पलूस तालुक्यातील पाचवा मैल या ठिकाणी तो राहतो. गेली दोन ते तीन वर्षापासून तो गोपीचंद पडळकर यांचा कट्टर कार्यकर्ता म्हणून वावरत आहे. पडळकर यांच्या सोबत तो नेहमी फिरत असतो. याच टकले यांनी विधानभवन परिसरात हंगामा केला. त्याचे पडसाद राजकीय वर्तूळात उमटले होते. विरोधकांनी यावर जोरदार टीकाही केली.
नक्की वाचा - Awhad vs Padalkar: विधानभवनात आव्हाड-पडळकरांचे कार्यकर्ते भिडले, जोरदार राडा
ऋषिकेश टकले याच्यावर पलूस पोलीस ठाण्यात 2013 ला 324 मारामारीचा व इतर गुन्हे दाखल आहेत. तर 2021 या काळात भिलवडी पोलीस ठाण्यात विनयभंग, मारामारी ,सरकारी कामात अडथळा, गंभीर दुखापत करणे, हाफ मर्डर असे गुन्हे दाखल आहेत. हाच टकले मकोकाचा आरोपी असल्याची माहिती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे. शिवाय हे राडेबाजी आणि हाणामारी करणे त्यामुळे ऋषिकेश टकले याला महागात पडण्याची शक्यता आहे. या हाणामारीमुळे आमदारच विधानभवनात सुरक्षित नाही असा संदेश संपूर्ण राज्यात गेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा घटनेचा निषेध करत दोषी विरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान या घटनेनंतर गोपिचंद पडळकर यांनीही ऋषिकेश टकले हा आपला कार्यकर्ता असल्याचं कबूल केलं आहे. शिवाय झालेल्या प्रकाराबाबत दिलगिरीही व्यक्त केली आहे. त्या शिवाय त्यांनी अधिक बोलण्याचं टाळलं आहे. या घटनेनंतर विधानभवनाचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले जात आहे. शिवाय चौकशीसाठी ही काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्याकडून झालेल्या या कृत्यामुळे सर्वच स्तरातून आता टीका होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world