जाहिरात

Sunetra Pawar: 'दादांकडे जाऊ दिलं नाही, आता वहिनींकडे तरी..' राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील 'ती' Audio Clip Viral

Sunetra Pawar Press Conference: समोर ठेवलेले माईक सुरू आहेत हे नेत्यांच्या लक्षातच आले नाही आणि त्यामुळे पक्षांतर्गत नेमके काय चालले आहे, याचे चित्र चव्हाट्यावर आले आहे.

Sunetra Pawar: 'दादांकडे जाऊ दिलं नाही, आता वहिनींकडे तरी..' राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील 'ती' Audio Clip Viral
Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांची पत्रकार परिषद वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.
मुंबई:

Sunetra Pawar Press Conference: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांची पहिलीच पत्रकार परिषद गुरुवारी (26 फेब्रुवारी) झाली. मात्र या परिषदेपेक्षा तिथे झालेली अंतर्गत कुजबूज आता महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि सुनेत्रा पवार हे तिघेही या पत्रकार परिषदेला सामोरे जाणार होते, पण त्याआधीच नेत्यांमध्ये जे संवाद झाले, ते माध्यमांच्या माईकमध्ये जसेच्या तसे कैद झाले आहेत. विशेष म्हणजे, समोर ठेवलेले माईक सुरू आहेत हे नेत्यांच्या लक्षातच आले नाही आणि त्यामुळे पक्षांतर्गत नेमके काय चालले आहे, याचे चित्र चव्हाट्यावर आले आहे.

माध्यमांची मोठी गर्दी असताना आणि बूम माईक टेबलावर मांडलेले असताना राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे आणि आमदार सरोज अहिरे तिथे उभे होते. यावेळी झालेल्या संभाषणातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. दादांजवळ जाऊ दिले नाही, आता वहिनींजवळ तरी जाऊ द्या, तुम्ही प्रश्न घेऊ नका, तुमचे बोलणे झाले की लगेच उठा, उलट-सुलट प्रश्न विचारले जातील, अशी वाक्ये या रेकॉर्डिंगमध्ये स्पष्ट ऐकू येत आहेत. यावरून सुनेत्रा पवार यांना पत्रकारांच्या प्रश्नांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न काही नेत्यांकडून जाणीवपूर्वक केला जात होता का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

( नक्की वाचा : Chhagan Bhujbal : पार्थिव समोर होतं आणि तुम्ही विलीनीकरण मागत होता?'; भुजबळांचा सवाल, NCP च्या बैठकीत सन्नाटा )

काय होते ते पडद्यामागचे संभाषण?

या पत्रकार परिषदेपूर्वी नेत्यांमध्ये झालेल्या संवादाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या रेकॉर्डिंगमध्ये काही नेते सांगत होते की, दादांजवळ जाण्याची संधी माणसांनी दिली नाही, आता किमान वहिनींजवळ तरी जाऊ द्या. इतकेच नाही तर सुनेत्रा पवार यांनी पत्रकारांचे प्रश्न घेऊ नयेत, त्यांचे मुद्दे मांडून त्यांनी लगेच तिथून उठावे, असा सल्लाही दिला जात होता.

क्रॉस क्वेश्चन्स जास्त होतील किंवा सध्या मनस्थिती नाही असे सांगा, असेही काही जण सुचवत होते. या सर्व प्रकारामुळे सुनेत्रा पवार यांच्यावर पक्षात कुणाचे नियंत्रण आहे आणि त्यांना नेमके कशाची भीती वाटतेय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

( नक्की वाचा : Sunetra Pawar: राष्ट्रवादीच्या नव्या 'बॉस' समोर 5 मोठी आव्हानं, प्रत्येक पायरीवर असेल कसोटीचा प्रसंग ! )

या कुजबुजीनंतर उपस्थित झालेले महत्त्वाचे प्रश्न

या सर्व प्रकरणामुळे आता चार प्रमुख प्रश्न उपस्थित झाले आहेत.

1. आमदारांना खरोखरच अजित दादांजवळ जाण्यापासून रोखले जात होते का? 
2. आमदारांना दादांच्या जवळ जाण्यापासून रोखणारे ते नेते नेमके कोण आहेत?
3.  सुनेत्रा पवार यांना त्यांना जे वाटते ते पत्रकार परिषदेत मोकळेपणाने मांडू द्यायचे नव्हते का?
4. पत्रकारांच्या प्रश्नांना कोण आणि कशासाठी इतके घाबरत होते?

या प्रश्नांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि संभ्रमावस्था पुन्हा एकदा समोर आली आहे.

रोहित पवारांचा सल्ला आणि तटकरेंशी भेट

या प्रकरणावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी सुनेत्रा काकींना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना दोन वेगवेगळे सल्ले दिले आहेत. रोहित पवार यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडेच होता. हे सल्ले दिल्यानंतर रोहित पवार जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले, तेव्हा तिथे एक वेगळाच प्रसंग घडला. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर बाहेर पडताना व्हरांड्यात सुनील तटकरे उभे होते. रोहित पवार आणि सुनील तटकरे समोरासमोर आले, पण दोघांनीही एकमेकांकडे साधे पाहिलेही नाही.

दोन्ही नेत्यांमधील वाढता संघर्ष

सुनील तटकरे काही नेते आणि पत्रकारांशी बोलत असताना त्यांच्यासमोरच रोहित पवार आणि भाजप आमदार मंदा म्हात्रे यांचे बोलणे सुरू होते. मात्र, रोहित पवार आणि सुनील तटकरे एक शब्दही न बोलता तिथून निघून गेले. अजित पवार यांच्या निधनानंतर रोहित पवार यांच्या निशाण्यावर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हेच प्रमुख नेते आहेत. 

सुनेत्रा पवार यांच्या पत्रकार परिषदेतील ते गुपित संभाषण रेकॉर्ड झाल्यामुळे राष्ट्रवादीतील या दोन गटांमधील छुपा संघर्ष आता अधिक तीव्र झाला आहे. पक्षात आता नक्की कोणाचे नियंत्रण चालते, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com