शरद पवारांवर प्रचंड प्रेम करणारे कार्यकर्ते नेते महाराष्ट्रात आहेत. पवारांनी आपल्या कौटुंबिक कार्यक्रमात हजर रहावे असं प्रत्येकालाच वाटतं. पवारही आपल्या कार्यकर्त्यांची नेत्यांचा मर्जी सांभाळत असतात. पण काही वेळा अचानक अडचणी उद्भवतात आणि अशा कार्यक्रमांना उपस्थित राहाता येत नाही. यावर राष्ट्रवादीच्या एका नेत्याने भन्नाट आयडिया शोधुन काढली आहे. मुलाच्या लग्नाला शरद पवारांनी यावं म्हणून त्यांनी केलेल्या सेटींगची चर्चा सध्या संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रविंद्र पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्याध्यक्ष आहेत. त्यांच्या मुलाचे लग्न होत आहे. विवाह म्हटलं की, शाही सोहळा, हौस आणि आनंद असतो. या सोहळ्याला शरद पवारांना यावं असा पाटील यांचा आग्रह होता. हा विवाह माळशिरस इथं होणार होता. तिथं सर्व तयारीही झाली होती. मंडप टाकला गेला होता. पाहुणेही तयार होते. माळशिरस तालुक्यातील बोरगावचे पाटील कुटुंब म्हणजे राजकीय घराणे म्हणुन नावाजलेले घराणे. याच बोरगावचे रवींद्र पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बडे नेते म्हणून ओळखले जातात.
पवारांवर निष्ठा असणारा कार्यकर्ता म्हणून रवींद्र पाटील यांच्याकडे पाहिले जाते. याच रवींद्र पाटील यांनी बोरगाव येथे लग्नाची जय्यत तयारी केली होती. मंडप उभारला होता. मात्र संध्याकाळच्या वेळी बोरगाव परिसरात शरद पवारांचे हेलिकॉप्टर येण्यास अडचण येऊ शकते. अशा परिस्थितीत शरद पवारांचा आपल्या मुलाच्या विवाह सोहळ्यातील दौरा रद्द होऊ शकतो अशी भिती त्यांच्या मनात होती. त्यामुळे त्यावर त्यांनी एक भन्नाट आयडिया करत एक जबरदस्त सेटींग केली.
यासाठी लग्नाचे तात्काळ ठिकाण बोरगाव येथून पंढरपूर येथील हेलिपॅड समोरच असणाऱ्या श्रेयस पॅलेस याठिकाणी हलवले. अन् शरद पवारांना हेलिपॅडची योग्य व्यवस्था आहे. त्यामुळे त्यांना लग्नाला यावच लागेल. असे निमंत्रण ही दिले. याच आग्रही निमंत्रणावरून शरद पवार पंढरपुरात विवाह सोहळ्याला पोहोचले. सामान्य कार्यकर्त्याशीही अगदी सहज संपर्क राखून ठेवणारे नेते म्हणून शरद पवारांची गेल्या पाच दशकात ओळख आहे. याच शरद पवारांसाठी राजकारणी पाहिजे ते करतात हे यावरून पुन्हा एकदा समोर आले आहे.