NCP Merger News: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुहुर्त ठरला

Ajit Pawar Death: बुधवारी (27 जानेवारी) झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे निधन झाले.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार असून त्यांच्या विलीनीकरणावर शिक्कामोर्तब झाले आहे. जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात याची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. दोन्ही गटांतील वरिष्ठ नेत्यांनी या मोठ्या राजकीय घडामोडीला दुजोरा दिला आहे.

नक्की वाचा: 14 बैठका, एकत्रिकरणाची तारीखही ठरली होती, दोन्ही राष्ट्रवादीत पडद्यामागे काय सुरु होतं?

अजित पवारांनीच घेतला होता पुढाकार 

बुधवारी (27 जानेवारी) झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे निधन झाले. मात्र, आपल्या निधनापूर्वीच त्यांनी काका शरद पवार यांच्यासोबत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण व्हावे यासाठीची बोलणी सुरू केली होती.  डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्यात विलीनीकरणासंदर्भात बैठका झाल्या होत्या. या बैठकांमध्ये दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीनंतर दोन्ही नेते संयुक्त पत्रकार परिषद घेऊन विलीनीकरणाची घोषणा करणार होते.

बड्या नेत्यांनी दिली वृत्ताला दुजोरा

शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या वृत्ताची पुष्टी केली आहे. ते म्हणाले की, "अजित पवारांच्या उपस्थितीतच विलीनीकरणाचा निर्णय झाला होता आणि मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे." तसेच जयंत पाटील यांनीही दोन्ही पक्षांत बैठका झाल्याचे मान्य करत लवकरच अधिकृत घोषणा होणार असल्याचे स्पष्ट केले. दुसरीकडे, अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न आणि औषध मंत्री नरहरी झिरवाळ यांनीही दोन्ही पक्ष एकत्र येत असल्याचे सांगितले. झिरवाळ यांनी शरद पवारांना यावर लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती केली असून, सुनेत्रा पवार यांना नवीन उपमुख्यमंत्री करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

नक्की वाचा: NCP Merger News: राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावरून मतभेद; अजित पवारांच्या 'या' नेत्यांना विरोध 

विलीनीकरणाचे संकेत आधीच मिळाले होते

जानेवारी महिन्यात झालेल्या महानगरपालिका निवडणुकीतच दोन्ही गट एकत्र येण्याचे संकेत मिळाले होते. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही पक्षांनी युती-आघाडीपासून फारकत घेत एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. जिल्हा परिषद निवडणुकीत शरद पवार गटाने अनेक ठिकाणी अजित पवार गटाच्या 'घड्याळ' चिन्हावर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विलीनीकरणाच्या चर्चेला अधिक बळकटी मिळाली आहे.

Advertisement

1999 ते 2026: राष्ट्रवादीचा राजकीय प्रवास

1999 मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. जुलै 2023 मध्ये अजित पवारांनी बंडखोरी करत महायुती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांसारखे मोठे नेतेही त्यांच्यासोबत गेले होते. मात्र, नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांना अपेक्षित यश न मिळाल्याने विलीनीकरणाच्या प्रक्रियेला वेग आला.

आता नेतृत्व कोणाकडे? 

विलीनीकरणानंतर पक्षाची धुरा कोणाच्या हातात असेल, याबाबत अद्याप संभ्रम आहे. सध्या राजकीय वर्तुळात शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. पुढच्या आठवड्यात दोन्ही गटांचे नेते पुन्हा एकदा बैठकीसाठी एकत्र जमतील आणि त्यानंतर विलीनीकरणावर अंतिम शिक्कामोर्तब होईल.
 

Advertisement
Topics mentioned in this article