NCP News: अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाच्या हालचालींना वेग आला आहे. शरद पवार गटातील नेते एकत्रीकरणासाठी घाई करत असताना, अजित पवार गटातील काही वरिष्ठ नेत्यांनी मात्र सावध पवित्रा घेतला आहे. मात्र पक्षांतर्गत पातळीवर मोठे मतभेद आणि 'पॉवर गेम' सुरू झाल्याचे वृत्त समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हे विलीनीकरण इतके सोपे नसेल, कारण दोन्ही गटांतील नेत्यांच्या भूमिकांमध्ये टोकाची तफावत आहे.
राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावरून मतमतांतरे
अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, अजित पवार गटातील काही नेत्यांच्या मते, हा मुद्दा आता केवळ राजकीय सोयीसाठी पुढे आणला जात आहे.
(नक्की वाचा- Ajit Pawar: अजित पवारांनंतर राष्ट्रवादीची धुरा कोण सांभाळणार? कुटुंबातील 3 आणि कुटुंबाबाहेरील 3 नावे चर्चेत)
कोणत्या नेत्याची काय भूमिका?
जयंत पाटील, शशिकांत शिंदे, राजेश टोपे हे नेते शरद पवार गटाचे असून, पक्ष पुन्हा एकसंध व्हावा यासाठी ते सुरुवातीपासून आग्रही आहेत. तर प्रफुल पटेल, सुनील तटकरे हे नेते सध्या केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहेत. विलीनीकरण झाल्यास त्यांचे सत्तेतील स्थान काय असेल, याबाबत त्यांच्यात साशंकता आहे.
नरहरी झिरवळ यांनी जाहीरपणे सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करून दोन्ही गट एकत्र आणण्याची मागणी केली आहे. तर छगन भुजबळ, धनंजय मुंडे ओबीसी आणि मराठा नेतृत्वाच्या समीकरणात आपले महत्त्व कमी होऊ नये, असे या नेत्यांना वाटत आहे.
'पवार फॅमिली'चा शब्द अंतिम
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या प्रक्रियेत राजकीय नेत्यांपेक्षा पवार कुटुंबातील सदस्यांचा निर्णय सर्वाधिक महत्त्वाचा ठरणार आहे. यामध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, पार्थ पवार, रोहित पवार आणि योगेंद्र पवार यांचा शब्द अंतिम असेल. सध्याच्या परिस्थितीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा निर्णय सर्वात मोलाचा ठरणार आहे. जर त्यांनी विलीनीकरणाला संमती दिली, तर अजित पवार गटाचे 41 आमदार पुन्हा शरद पवारांच्या छत्राखाली येऊ शकतात.
(नक्की वाचा- Ajit Pawar News: "12 डिसेंबरलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या, पण..." अंकुश काकडेंचा मोठा दावा)
विलीनीकरणातील अडथळे
अजित पवार गटाचे नेते सध्या सत्तेत आहेत. विलीनीकरणानंतर त्यांना ही पदे सोडावी लागतील का? निवडणूक आयोगाने 'घड्याळ' चिन्ह आणि पक्षाचे नाव अजित पवार गटाला दिले आहे. विलीनीकरण झाल्यास या चिन्हाचे काय होणार? वर्षभरापासून एकमेकांवर टीका करणारे दोन्ही गटांचे कार्यकर्ते जमिनीवर एकत्र कसे येतील? असे अनेक प्रश्न या पार्श्वभूमीवर निर्माण झाले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world