राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शहरात पक्षाचे एकदिवसीय शिबीर पार पडले. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. पाटील आपल्या भाषणात म्हणाले की, प्रभू श्रीरामाच्या, सीता मातेच्या आणि प्रभू लक्ष्मणाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. वर्णद्वेषाला प्रचंड ताकदीने मोडून काढण्याचं काम देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच भूमीत केले. त्यामुळे या परिवर्तनवादी विचाराचे स्मारक या भूमीत व्हावे. त्याचप्रमाणे वामन दादा कर्डक आणि बाबुराव बागल यांचेही स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच केली.
सध्या चर्चेत असलेल्या मतचोरीच्या मुद्यावर भाषण करताना ते म्हणाले की, लोकसभेत आपल्या पक्षाने दहा पैकी आठ जागा जिंकत उत्तम कामगिरी केली. वोट चोरीचे प्रकरण झाले नसते तर शशिकांत शिंदे यांची जागा देखील आपण जिंकलीच होती. विधानसभेत दुर्दैवाने अनपेक्षित निकाल लागला. असा निकाल का लागला याची कारणे आता पुढे येऊ लागली आहेत. पक्ष फोडले, पक्ष चोरले, त्यावर समाधान नाही झाले तर मत चोरी देखील झाली असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.
गेल्या काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत त्यामुळे एक पिढीच्या पिढी प्रतिनिधीत्वापासून वंचित राहिली. हे घटनेच्या विरोधात आहे. लोकशाहीला फार मोठा धक्का आहे असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. शिवाय, निवडणूक आयोगामागे मोठी शक्ती उभी असल्याची शक्यता आहे, त्यामुळेच ते सर्वोच्च न्यायालयाला देखील जुमानत नसल्याचे दिसते असे ते म्हणाले. मुंबई महानगरपालिकेच्या 11 हजार कोटींच्या मुदत ठेवी अडीच वर्षात मोडीत काढल्या. तरी सुद्धा मुंबईची अवस्था अत्यंत दयनीय आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकायच्या असतील तर बूथ कमिट्यांवर भर द्या. पक्षाचे बीएलए निवडा. मतांची चाचपणी करा. नव्या चेहऱ्यांना संधी द्या. स्थानिक पातळीवर संवाद सुरू करा असे आवाहन करत असतानाच त्यांनी तरुणांसाठी राजकीय पोर्टल सुरू करा, त्यास शरद पवार यांचं नाव द्या. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये तरुण चेहऱ्यांना संधी द्या असे ते म्हणाले. गाव-शहरातील मुद्द्यांवर काम कराच. त्याचबरोबर अनेक लाडक्या बहिणींना पैशांपासून वंचित का ठेवले? पाकिस्तान सोबतची लढाई आपण का थांबवली? ट्रम्पने युद्ध थांबवलं का? त्यांनी कर का वाढवला? असे प्रश्नही विचारा. सोशल मीडिया प्रभावीपणे वापर कराच मात्र प्रत्यक्ष भेटींवर जास्त भर द्या. गट तट विसरून आपण सर्वजण एकदिलाने काम करा असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.