विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा सध्या सुरू आहे. ही चर्चा कोणत्याही वादा शिवाय होत असल्याचे आघाडीचे नेते सांगत आहेत. शिवाय ही चर्चा सामंज्यस्याने होत असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र पडद्यामागे अनेक गोष्टी आणि वाद उफाळून येत आहेत. आता आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि समाजवादी पक्ष हे काही जागांवर अडून बसले आहेत. दोन्ही पक्षांनी या जागा सोडण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आघाडीत पेच निर्माण झाला आहे. यावर तोडगा कसा काढायचा असा मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महाविकास आघाडीचे जागा वाटप हे शेवटच्या टप्प्यात असल्याचे सांगितले जाते. शिवाय मुंबईतले जागा वाटप पूर्ण झाल्याचीही चर्चा होती. मुंबईतल्या जागा वाटपा वरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात जोरदार रस्सीखेच होती. आता ही रस्सीखेच आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि समाजवादी पार्टीत सुरू झाली आहे. मुंबईतल्या अणूशक्तीनगर विधानसभा मतदार संघातव राष्ट्रवादी बरोबरच समाजवादी पार्टीनेही दावा सांगितला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा कोणत्याही स्थिती सोडणार नसल्याची भूमिका घेतली आहे. शिवाय या मतदार संघात जो उमेदवार असेल तो तुतारी या चिन्हावरच निवडणूक लढेल असेही पक्षाने स्पष्ट केले आहे. तर समाजवादी पार्टीने स्वरा भास्कर यांचे पती फहाद अहमद यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याची तयारीही केली आहे.
या दोन पक्षात केवळ या जागेवरच वाद आहे असे नाही. तर भिवंडी पूर्व विधानसभा मतदार संघावर ही राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने दावा केला आहे. इथे सध्या समाजवादी पक्षाचे रईस शेख हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे ही जागा समाजवादी पार्टीलाच मिळावी अशी पक्षाची भूमिका आहे. मात्र ही जागा राष्ट्रवादीच्या कोट्यातून मागिल वेळी समाजवादीला देण्यात आली होती. त्यामुळे या जागेवर राष्ट्रवादीने पुन्हा आपला हक्क सांगितला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षात सध्या तणाव निर्माण झाला आहे.
ट्रेंडिंग बातमी - नागपूर हिट अँड रन आरोपी रितिका मालूला अखेर मध्यरात्री बेड्या, नेमके प्रकरण काय?
अणूशक्तीनगर विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व हे नवाब मलिक करत आहेत. सध्या ते राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत. ते ही निवडणूक लढणार की मुलीला मैदानात उतरवणार हे अजूनही स्पष्ट नाही. अशा वेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाने या जागेवर तयारी सुरू केली आहे. काही झाले तरी ही जागा सोडायची नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. शिवाय भिवंडी पूर्वची जागा मिळवण्याचाही राष्ट्रवादीचा आग्रह आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भिवंडी मतदार संघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बाळ्यामामा विजयी झाले होते. त्यामुळे शरद पवार गटाता आत्मविश्वास वाढला आहे.