विधानसभा निवडणुकीत महायुतीला जबरदस्त यश मिळाले. पण त्यांचा मुख्यमंत्री कोण हे ठरत नव्हते. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळावे यासाठी आग्रही होते. त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्नही सुरू होते. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका चाली मुळे त्यांचा डाव उधळला गेला. त्याच वेळी भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनीही आमची संख्या जास्त त्यामुळे आमचाच मुख्यमंत्री ही भूमीका ठाम पणे घेतली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पुढे कोणताच पर्याय राहीला नाही. त्यांनी तुम्ही घ्याल तो निर्णय मान्य असेल असे जाहीर केले. निकाल लागल्यानंतर दिल्लीत पडद्या मागे नक्की काय हालचाली झाल्या. त्याची प्रत्येक बाब सांगणारी ही इनसाईड स्टोरी आपण जाणून घेऊया.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपद मिळावे यासाठी दबाव वाढवला होता. शिवसेनेच्या सर्व आमदारांना मुंबईत बोलवले होते. त्याच वेळी राज्यात अनेक ठिकाणी शिंदेच मुख्यमंत्री हवेत यासाठी त्यांच्या समर्थकांकडून प्रार्थना केल्या जात होत्या. त्यातून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न होता. त्याच वेळी महायुतीतला दुसरा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मात्र दिल्लीत होते. त्यांनी त्याच वेळी भाजपच्या पक्षश्रेष्ठी बरोबर संपर्क केला होता. जर संख्याबळ नसताना एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार असेल तर आम्हालाही 1 वर्षासाठी मुख्यमंत्री करावे अशी मागणी केली. शिवाय ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री अशी भूमीका प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी घेतली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी चालतील असं ही त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादीच्या या भूमीकेमुळे एकनाथ शिंदे हे बॅकफूटवर गेले.
राज्यात एकनाथ शिंदेंसाठी त्यांचे समर्थक मैदानात उतरले होते. निवडणुकीतले यश हे शिंदेंमुळे कसे मिळाले हे ते सांगत होते. त्याच बरोबर देवालाही साकडं घातलं जात होते. मराठा चेहरा म्हणूनही प्रमोट केलं जात होतं. राज्यात एक वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत होता. त्यामुळे निकालानंतर चार दिवस शिंदे काहीच बोलले नव्हते. यासर्व गोष्टी लक्षात घेता दिल्लीतल्या भाजपच्या एका जेष्ठ नेत्याने शिंदे यांना फोन केला होता. तुम्ही दबाव टाकत आहात. असं करणं योग्य नाही. निवडणुकीतही आपण महायुतीचा मुख्यमंत्री कोण हे निकालानंतर ठरवू असं सांगत होतो. याची आठवण त्यांनी करून दिली. त्यामुळे दबावाचे राजकारण करून काही होणार नाही असा संदेश या नेत्याने शिंदे यांना दिला.
या विधानसभा निवडणुकीत भाजपचे सर्वात जास्त आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री हा भाजपचाच व्हावा असं सर्वांना वाटत आहे असंही या नेत्याने शिंदे यांना सांगितले. शिवाय तुमचे सहकार्य या आधी मिळाले आहे. यापुढे ही तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे असंही त्यांनी सांगितलं. ही बोलणी झाल्यानंतर काही तासात आपण आपली भूमीका स्पष्ट करू असे शिंदे यांनी या नेत्याला सांगितले. त्यानंतर त्यांनी आपल्या नेत्यांना कोणाशीही बोलू नये. माध्यमांना प्रतिक्रिया देवू नये अशा सुचना केल्या.
ट्रेंडिंग बातमी - Live Update : प्रियांका गांधींनी लोकसभेत खासदारकीची घेतली शपथ
या सर्व घडामोडी होत असताना शिंदेंचे काही वरिष्ठ मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला ही गेले. सागर बंगल्यावर त्यांची भेटही झाली. पण त्यातून काही जास्त साध्य झालं नाही. दिल्लीतील नेते मुख्यमंत्रिपद सोडण्यास तयार नाहीत. यावेळी जास्त आमदार भाजपचे आहेत तर मुख्यमंत्री भाजपचाच होणार अशी ठाम भूमीका त्यांची होती. त्यामुळे शिंदेंचाही नाईलाज झाला. त्यांनी नमतं घेतलं. शिंदेंनी पत्रकार परिषद घेतली. निर्णय घेण्याचे सर्व अधिकार त्यांनी भाजपच्या श्रेष्ठींना दिले. दिल्ली या आधी ही साथ होती. या पुढेही अशीच साथ राहील असं त्यांनी सांगितलं. कोणतीही अडचण सत्ता स्थापनेत येणार नाही असं त्यांना स्पष्ट करावं लागलं.
मुख्यमंत्रिपदासाठी शिंदेंचा दबाव होता अशी चर्चा आहे. त्यासाठी ते प्रयत्न करत होते. पण जरी त्यांना मुख्यमंत्रिपद मिळाले नसले तरी त्यांनी काही महत्वाची खाती स्वताच्या पदरात पाडून घेतल्याची चर्चा आहे. त्यात मात्र त्यांना यश आल्याचं बोललं जात आहे. उपमुख्यमंत्रिपदासहीत काही महत्वाची खाती शिंदेंच्या गळाला लागली आहेत. शिवाय आमदारांच्या संख्ये प्रमाणे मंत्रिपद मिळणार आहेत. त्यातही एखादं जास्तीचं मंत्रिपद शिंदेंच्या हाताला लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या ऐवजी शिंदे यांनी आपल्या सहकार्यांसाठी अधिकची खाती घेतल्याची चर्चा आहे. त्यात त्यांना यश आलं आहे.