नुकतेच शरद पवार गटात प्रवेश केलेला आणि अहमदनगर दक्षिणचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांचा आपल्या मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे. शेतकरी कुटुंबातून राजकारणात आलेले निलेश लंके यांनी कोरोना काळात केलेल्या कामामुळे देशपातळीवर त्यांचं कौतुक झालं होतं. त्यामुळे जनसामान्यातला नेता म्हणून त्यांना ओळखलं जातंय. सध्या मतदारसंघामध्ये त्यांची स्वाभिमान जनसंवाद यात्रा सुरू आहे. स्वाभिमान जनसंवाद यात्रेला सध्या चांगला प्रतिसाद मिळत असून लोक भरभरुन प्रेम देत असल्याचे निलेश लंके यांनी म्हटलं आहे.
लोग मेरे को नोट भी देते और वोट भी, असं म्हणत महाविकास आघाडीचे नगर दक्षिणचे उमेदवार निलेश लंके यांनी खिशातून 500 आणि 100 ची नोट काढून आपल्याला एका लहान मुलीने खाऊसाठी जमा केलेले शंभर रुपये आणि एका शेतात काम करणाऱ्या महिलेने 500 रुपये निवडणुकीसाठी मदत दिल्याचं म्हटलं आहे. अहमदनगरच्या माहीजळगाव येथे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांची स्वाभिमान जनसंवाद यात्रा गेली असता तेथे देखील एका शेतकऱ्याने त्यांना आर्थिक मदत दिली आहे. प्रत्येक सभेत आपल्याला आर्थिक मदत मिळत असल्याचे म्हणत शेतकरी कांद्याची पट्टी, सेवा निवृत्त शिक्षकांने एक महिन्याची पेन्शन दिल्याचा किस्सा लंके यांनी सांगितला. यावेळी त्यांनी खिशातुन 100 आणि 500 नोट काढून दाखवली.
अहमदनगर दक्षिणमध्ये सुजय विखे विरूद्ध निलेश लंके
दक्षिण अहमदनगर मतदारसंघातून भाजपकडून सुजय विखे यांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलं आहे. तर शरद पवारांनी राजकीय खेळी करीत अजित पवार गटातील निलेश लंके यांना मविआतून दक्षिण नगरसाठी उमेदवारी दिली. त्यामुळे येथे सुजय विखेंना मोठं आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे. राष्ट्रवादीतील फूट, भाजपमधील अंतर्गत शीतयुद्ध याचा विचार करता यंदाची निवडणुकीत भाजपसाठी सोपी असणार नाही.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सुजय विखे यांना भाजपने दक्षिण नगरमधून तिकीट दिलं. 1952 ते 1996 या कालावधीत हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र भाकरी फिरली आणि या जागेवरुव भाजपच्या तिकीटीवरून लढणारे सुजय विखे विजय झाली. लोकसभेनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत या लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभांपैकी चार ठिकाणी राष्ट्रवादी आणि दोन ठिकाणी भाजपचे आमदार विजयी झाले. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनीही राजकारणात प्रवेश करण्यासाठी अहमदनगरचा मार्ग निवडला. त्यांनी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून राम शिंदे यांना पराभूत केलं. गेल्या काही वर्षात सुजय विखे विरूद्ध राम शिंदे यांच्या संघर्षाच्या चर्चा समोर येत आहे. राम शिंदे यांना खासदारकी लढवायची होती, मात्र सुजय विखेंना पुन्हा संधी देण्यात आली. दुसरीकडे निलेश लंके आधीपासून या मतदारसंघात तयारी करीत होते.