Nitin Gadkari : 'आमच्या चौथ्या टर्मची खात्री नाही, पण... ' नितीन गडकरींनी जाहीरपणे सांगितलं

Nitin Gadkari : आमचं सरकार चौथ्यांदा सत्तेवर येईल याची खात्री नाही, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीरपणे सांगितलं आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
नागपूर:

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षातील एका मोठ्या नेत्याने तुम्ही पंतप्रधान झालात तर पाठिंबा देऊ अशी ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट गडकरी यांनी नुकताच केला होता. त्यापाठोपाठ आमचं सरकार चौथ्यांदा सत्तेवर येईल याची खात्री नाही, असं गडकरी यांनी जाहीरपणे सांगितलं. त्यामुळे नवी चर्चा सुरु झाली आहे. नागपूरमधील एका कार्यक्रमात गडकरी यांनी हे वक्तव्य केलंय. केंद्रीय मंत्री रामदास आठवले देखील यावेळी स्टेजवर उपस्थित होते. 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) पक्षाचे नेते रामदास आठवले मोदी सरकारच्या तिन्ही कार्यकाळात मंत्री आहेत. भाजपा सरकार चौथ्यांदा सत्तेवर आलं तर पुन्हा एकदा मंत्री होऊ, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर आठवले यांना उद्देशून बोलताना गडकरी यांनी हे वक्तव्य केलं. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले गडकरी?

'आमचं सरकार चौथ्यांदा सत्तेवर येण्याची खात्री नाही. पण, रामदास आठवले मंत्री होतील हे निश्चित आहे,' असं गडकरी यावेळी म्हणाले. मी हे विनोदानं सांगत असल्याचं स्पष्टीकरण गडकरींनी यावेळी दिलं. 

रामदास आठवले यांचा पक्ष (RPI, A) महाराष्ट्रातील सत्तारुढ महायुतीचा भाग आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आमचा पक्ष किमान 10 ते 12 जागा लढवेल, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला. नागपूरमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आम्ही पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढवणार आहोत. विदर्भातील तीन ते चार जागांची मागणी आम्ही केली आहे. त्यामध्ये उत्तर नागपूर, उमरेड ( नागपूर), उमरखेड या मतदारसंघांचा समावेश आहे, असं त्यांनी सांगितलं. 

( नक्की वाचा : 'उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असं वाटलं नव्हतं', तर रश्मी ठाकरे... गोगावलेंचं मोठं वक्तव्य )

आमची 18 उमेदवारांची यादी तयार आहे. ती यादी आम्ही महायुतीमधील मित्र पक्षांना काही दिवसांमध्ये देणार आहोत. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी त्यांच्या कोट्यातील चार जागा आम्हाला द्याव्यात अशी मागणी, आठवले यांनी केली आहे. 

अजित पवार यांच्या पक्षाचा महायुतीमध्ये समावेश झाल्यानं रिपब्लिकन पार्टी आठवले गटाला आश्वासन मिळूनही महायुतीमध्ये मंत्रिपद मिळू शकलं नाही, असा दावा आठवले यांनी काही दिवसांपूर्वी पालघरमध्ये बोलताना केला होता.  

Topics mentioned in this article