मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना पुणे सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यांच्या विरोधातील अजामीन पात्र वॉरंट न्यायालयाने रद्द केले आहे. मात्र हे करत असताना जरांगेंची कोर्टाने चांगलीच कानउघाडणी केली आहे. न्यायालयाचा अवमान करू नका. बोलताना जपून बोला अशा शब्दात न्यायालयाने जरांगे यांना झापले आहे. दहा वर्षा पूर्वीच्या एका फसवणूकीचा खटला पुण्यात सुरू आहे. त्याच्या सुनावणीला जरांगे वारंवार गैरहजर राहात होते. या पार्श्वभूमीवर जरांगे यांच्या विरोधात अजामीन पात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यावर आज शुक्रवारी सुनावणी झाली.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मराठा समाजाच्यावतीने मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एका नाटकाचे आयोजन केले होते. नाटकाचा कार्यक्रम झाला. पण त्यानंतर निर्मात्याला या नाटकाचे पैसे देण्यात आले नाहीत. या प्रकरणी निर्मात्याने तक्रार दाखल केली होती. त्यानुसार जरांगे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण दहा वर्ष जुने आहे. या खटल्याला जरांगे वारंवार गैरहजर राहात होते. त्यामुळे हा खटला लांबला. त्यानुसार कोर्टाने त्यांच्या विरोधात अजामीन पात्र वॉरंट जारी केले होते. शिवाय त्यांना कोर्टात हजर राहण्यास सांगितले होते. त्यामुळे जरांगे पुणे सत्र न्यायालयात हजर झाले.
वारंवार या प्रकरणी गैरहजर राहत असल्याबाबतही कोर्टाने यावेळी जरांगे यांना झापले आहे. गैरहजर राहात असल्यामुळे हा खटला लांबल्याचेही त्यांनी सांगितले. शिवाय अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले तरी न्यायालयाचा अवमान खपून घेतला जाणार नाही. या पुढे बोलताना न्यायालयाचा अवमान होणार नाही याची काळजी घ्या अशा शब्दात न्यायालयाने जरांगे यांना सुनावले आहे. दरम्यान जरांगे हे आजारी आहेत. त्यांना मूत्रपिंडाचा विकार आहे. त्याबाबतचे वैद्यकिय प्रमाणपत्र ही यावेळी न्यायालयात सादर करण्यात आले. त्यामुळे अटक वॉरंट रद्द करावा अशी मागणी जरांगेंच्या वकीलांनी केली. पण त्याला सरकारी वकीलांनी विरोध केला होता.