- पालघर लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार डॉ. हेमंत सवरा यांना संसद रत्न पुरस्कार २०२६ जाहीर झाला
- डॉ. सवरा यांना संसदीय उपस्थिती, लोकहित प्रश्नांची मांडणी आणि कार्यक्षमतेसाठी हा पुरस्कार मिळाला आहे
- महाराष्ट्रातून एकूण पाच खासदारांना संसद रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे
मनोज सातवी
Palghar News: पालघर लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांना देशातील अत्यंत प्रतिष्ठेचा ‘संसद रत्न पुरस्कार 2026' जाहीर झाला आहे. संसदेतील उत्कृष्ट उपस्थिती, लोकहितैषी प्रश्नांची प्रभावी मांडणी आणि उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर त्यांची या मानाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या यादीत महाराष्ट्रातील एकूण 5 खासदारांचा समावेश आहे. त्यात डॉ. सवरा यांनी पटकावलेले स्थान पालघर जिल्ह्यासाठी भूषणावह ठरले आहे.
कामगिरीची राष्ट्रीय स्तरावर दखल
खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी संसदेत पालघरच्या स्थानिक आणि आदिवासी विकासकामांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांच्या याच सातत्यपूर्ण आणि प्रभावी संसदीय कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. जुलै 2026 मध्ये नवी दिल्ली येथे आयोजित एका भव्य सोहळ्यात या 16 व्या संसद रत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. डॉ. सवरा यांच्या या यशामुळे पालघरच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्रातील ‘या' खासदारांचा बहुमान
या पुरस्काराच्या माध्यमातून संसदेत महाराष्ट्राचा डंका पाहायला मिळाला आहे. यंदाच्या संसद रत्न पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून डॉ. हेमंत सवरा यांच्यासह डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, स्मिता वाघ आणि डॉ. मेधा कुलकर्णी या अन्य 4 खासदारांनाही हा बहुमान जाहीर झाला आहे. एकूण 5 खासदारांच्या या निवडीमुळे देशाच्या राजधानीत महाराष्ट्राच्या संसदीय सुशासनाचा ठसा उमटला आहे.