- महाराष्ट्रात मे महिन्यात उष्णतेचा प्रचंड तडाखा असून अनेक भागांत तापमान चाळीशी पार झाले आहे
- सह्याद्रीच्या कुशीत असलेले महाबळेश्वर दाट धुक्याने आच्छादित होऊन नयनरम्य दृश्य सादर करत आहे
- महाबळेश्वरमध्ये उन्हाळ्यातही थंडगार वारा आणि गारवा अनुभवण्यासाठी राज्यभरातून पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत
राहुल तपासे
राज्यात एकीकडे उष्णतेचा पारा चढला आहे. अनेक ठिकाणी तो चाळीशी पार झाला आहे. असे असताना दुसरीकडे सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं महाबळेश्वर मात्र स्वर्गिय रुप धारण करताना दिसत आहे. मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात अचानक दाट धुक्याची चादर महाबळेश्वरमध्ये पसरल्याचे दिसत आहे. त्यामुळे संपूर्ण महाबळेश्वर आणि पाचगणी परिसर अक्षरशः नयनरम्य बनला आहे. त्यामुळेच पर्यटक इथं मोठ्या संख्येने येताना दिसत आहे. इथले व्हिडीओ आता व्हायरल होत आहेत. एकीकडे उन्हाचा उकाडा तर दुसरीकडे धुकं हा निसर्गाचा चमत्कारच म्हणावा लागेल अशा प्रतिक्रीया उमटत आहेत.
महाबळेश्वरच्या वेण्णा लेकवरील धुक्यात हरवलेल्या बोटी, ऑर्थर सीटवर ढगांशी स्पर्धा करणारे पॉईंट्स, तर केट्स आणि एल्फिन्स्टन पॉईंटवरून दिसणारा धुक्याचा समुद्र, या सर्व दृश्यांनी पर्यटक अक्षरशः भारावून गेले आहेत. उन्हाळ्यातही थंडगार वारे, अंगाला झोंबणारा गारवा आणि ढगांमध्ये हरवलेले डोंगर पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक मोठ्या संख्येने महाबळेश्वरकडे धाव घेत आहेत. त्यामुळेच हॉटेल्स हाऊसफुल झाली आहेत. बाजारपेठांमध्ये चैतन्य आलं आहे. सध्यात संपूर्ण महाबळेश्वरच हाऊसफुल आहे.
सध्या महाबळेश्वर पाचगणी मध्ये स्ट्रॉबेरीचा हंगाम आहेत. त्यामुळे त्याचा ही अस्वाद घेताना पर्यटक इथं दिसत आहेत. या शिवाय मक्याचा आस्वाद घेत पर्यटक या निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, सोशल मीडियावरही महाबळेश्वरमध्ये पसरलेल्या धुक्याचे व्हिडिओ आणि रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. “महाराष्ट्रातील मिनी काश्मीर” अशीच प्रतिक्रिया पर्यटकांकडून व्यक्त केली जात आहे. उन्हाच्या तडाख्यातून काही क्षणांची सुटका आणि निसर्गाच्या या मोहक रुपाचा अनुभव घेण्यासाठी महाबळेश्वरचा पर्यटन हंगाम आता चांगलाच बहरात आला आहे.
मुंबई असो की पुणे असो उकाड्याने सर्वच जण हैराण झाले आहेत. प्रत्येक जण पावसाची वाट पाहात आहे. अशा वेळी जवळच्या हिलस्टेशनवर जाण्याचा पर्यटकांचा कल असतो. विकएन्डला तर सर्वांचा प्लॅन ठरलेला असतो. कोणी समुद्र किनारी जाणे पसंत करतो तर कुणी रिसॉर्टमध्ये. पण सध्याचा उकाडा पाहाता अनेकांची पावलं आपोआप महाबळेश्वर पाचगणीच्या दिशेने वळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सध्या महाबळेश्वरचं तापमान सकाळी 25 अंश सेल्सिअसपर्यंत आहे. तर संध्याकाळी हा पारा आणखी खाली घसरतो. त्यामुळे चांगल्या थंडीचा अनुभव पर्यटकांना घेता येत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world