सगेसोयऱ्यांसह मराठ्यांना आरक्षण द्यावे या मागणीसाठी मराठ नेते मनोज जरांगे पाटील गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. त्याचवेळी ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देऊ नये यासाठी राज्यातील ओबीसी नेते सक्रीय झाले आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं सध्या जालना जिल्ह्यातल्या वडीगोद्रीमध्ये उपोषण सुरु आहे. या उपोषणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघत आहे. त्याचवेळी राज्यातील प्रमुख ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेलं ट्विट चर्चेचा विषय बनलं आहे.
काय म्हणाल्या पंकजा?
पंकजा मुंडे यांनी सोशल मीडिया नेटवर्क X वर ट्विट करत वडीगोद्रीमधील आंदोलनाचं कौतुक केलं आहे. 'आंदोलन कसे करावे सालस अभ्यासपूर्ण आणि भावनांना हात घालताना मुद्दा मांडताना घटने बद्दल आदर ठेवणे शिकायचे असेल तर वडी गोदरी मध्ये पहा...वाह रे वाह..' असं ट्वि्ट पंकजा यांनी केलंय. वडीगोद्रीमधील आंदोलनाचं कौतुक करत असतानाच पंकजा यांनी शिकण्याचा इशारा कुणाला दिलाय? याची चर्चा आता सुरु झाली आहे.
ओबीसी आंदोलक आक्रमक
ओबीसीमधील आरक्षणाच्या संरक्षणासाठी महिलाही आक्रमक झालेल्या दिसून येत आहेत. बीडच्या आष्टी तालुक्यातील हातोला येथे रस्त्यावर उतरत महिलांनी टायरची जाळपोळ केली. यामुळे बीड-अहमदनगर-कल्याण महामार्ग काही काळ बंद होता. आमच्या भावनांचा विचार केला नाही तर दुर्गेचा अवतार धारण करू, असा इशारा या महिलांनी आंदोलनाच्यावेळी दिला.
( नक्की वाचा : भुजबळांचं करियर उद्धवस्त केलं नाही तर नाव बदलेन, जरांगे पाटील यांचं थेट आव्हान )
लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या आंदोलनस्थळी गिरीश महाजन, उदय सामंत, अतुल सावे, संदीपान भुमरे यांच्यासह सरकारच्या शिष्टमंडळांनी भेट देत चर्चा केली. ओबीसी समाजाच्या वतीने छगन भुजबळ, पंकजा मुंडे, प्रकाश शेंडगे आणि विजय वडेट्टीवर यांचं शिष्टमंडळ सरकारसोबत चर्चा करणार आहे.