- महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले नाही
- संजय जाधव यांनी दोन्ही शिवसेना गटांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे
- भाजपने शिवसेनेत फूट पाडण्यासाठी चाणक्यनिती वापरली असून ठाकरेंना आणि नंतर शिंदेंना संपवण्याचा प्रयत्न केला
नजीर खान
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अपेक्षित यश मिळालं नाही. मराठवाड्यात तर पक्षाची मोठी पिछेहाट झाली. पुण्यात भोपळाही फोडता आला नाही. दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेची स्थिती ही काही चांगली नव्हती. मुंबईतली सत्ता गमवावी लागली. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी दोन्ही शिवसेनेला एक होण्याचे आवाहन केले आहे. भाजप हा चाणक्यनिती वापरणारा पक्ष आहे. त्यांनी आधी ठाकरेंना संपवण्याचा प्रयत्न केला. आता ते एकनाथ शिंदेंना संपवत आहेत. जर दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर ते भाजप समोर मोठं आव्हान उभं करू शकता असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला आहे. हा परभणी पॅटर्न असल्याचं ही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं.
परभणी महापालिका निवडणुकीत ठाकरेंची सेना सत्ता स्थापन करणार आहे. पण इथं शिंदेंच्या सेनेला खातंही उघडता आलं नाही. तर भाजपनं पैसे देवून 10-12 जण निवडून आणले असं खासदार संजय जाधव म्हणाले. जनता हुशार आहे. समाजाचं काम करणारे लोक निवडून येतात. भाजपने फक्त आर्थिक बळावर निवडणुका लढण्याचा सपाटा लावला आहे. शिंदेंचा पक्ष मराठवाड्यात बॅकफूटवर गेला आहे. भाजपनं त्यांच्यावर कुरघोडी केली आहे. भाजप चाणक्य निती वापरणारा पक्ष. एकसंध शिवसेना होती त्यावेळी भाजपची ललकारण्याची हिंमत नव्हती. ती हिंमत आता त्यांच्या आली आहे.
त्यामुळेच शिवसेनेत भाजपने फूट पाडली असा आरोप त्यांनी केला. त्यासाठी आपण एकनाथ शिंदेंना दोष देणार नाही. त्यांना हाताशी धरून हे कांड भाजपने केले. शिंदेंना मुख्यमंत्रीपदाचे गाजर दिलं. त्यातून एका पक्षाचे दोन पक्ष केले. त्यानंतर दोन्ही पक्षांवर हल्ला केला. आधी उद्धव ठाकरेंना संपवण्याचा प्रयत्न केला. आता शिंदेंना संपवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आता शिंदेंनी हुशार व्हावं असा सल्ला ही जाधव यांनी दिला. शेवटी बाप हा बाप असतो असं सुचक विधान त्यांनी केला. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत. आणि हा पक्ष बाळासाहेबाचा आहे असं ही ते यावेळी म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी स्वताच्या स्वार्थासाठी पक्ष हायजॅक केला. तुम्हाला मुख्यमंत्री होण्यासाठी हे केलं. आता तुमचं समाधान झालं असेल. तुमचा हेतू मुख्यमंत्री होण्याचा होता. तो पूर्ण झाला. आता वेळीच शहाणं होवून शिंदेंनी शिवसेना ठाकरे गटासोबत बसलं पाहीजे.समन्वय ठेवला पाहीजे. पवार एकत्र येवू शकतात मग शिवसेना एकसंध का होवू शकत नाही असा प्रश्न ही त्यांनी केला. शिवसेनेसाठी शिंदेंनी काही केले नाही. त्यांनी निवडून आलेल्या आमदारांना हाताशी घेतले. पैशाच्या जोरावर त्यांनी हे केले. पण पैसे संपल्यावर काय. कारण ते एक दिवस संपणार आहेत. अशात भाजप तुम्हाला गिळून टाकणार आहे असा इशारा ही जाधव यांनी या निमित्ताने दिला.
एकनाथ शिंदे हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी वेळीच जागे व्हावे. दोन्ही शिवसेना एकत्र करून भाजप समोर आव्हान उभे करावे असं ही ते म्हणाले. मित्रत्वाच्या नात्याने ही विनंती करतो असं ही ते म्हणाले. तुम्ही साठी ओलांडली आहेत. आता किती दिवस जगणार आहे असं ही ते शिंदेंना संबोधून बोलले. आपण मेलो तरी चालेल पण पक्ष कधी मरता कामा नये. तो जिवंत ठेवला पाहीजे. बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवायचे असेल तर दोन्ही सेना एकत्र झाले पाहीजे असं त्यांनी बोलून दाखवलं. परभणीत आपण सर्व समाज्याच्या लोकांना एकत्र केले. त्यामुळे भाजपचे काही चालले नाही. या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचा महापौर तर काँग्रेसचा उपमहापौर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.