स्वानंद पाटील, प्रतिनिधी
भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा बालेकिल्ला अशी परळीची ओळख आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. मागील निवडणुकीत पंकजा यांचा त्यांचे चुलत भाऊ धनंजय मुंडे यांनी पराभव केला. मागील वर्षभरात राज्यातील राजकारण बदललं. पंकजा आणि धनंजय हे बहिण-भाऊ महायुतीमध्ये एकत्र आले. पंकजा यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपानं त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे परळीमधील आगामी विधानसभा निवडणूक महायुतीकडून धनंजय मुंडे लढणार हे स्पष्ट झालंय. परळी विधानसभेच्या निवडणुकीत नव्या उमेदवाराची एन्ट्री झाल्यानं धनंजय मुंडे यांचं टेन्शन वाढलं आहे.
महायुतीविरुद्ध एन्ट्री
काहीही झाले तरी परळी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे राजेभाऊ फड यांनी जाहीर केलं आहे..जो पक्ष तिकीट देईल त्या पक्षाकडून किंवा अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे राजेभाऊ फड यांनी सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उमेदवारीसाठी साद घातली. महाविकास आघाडीमध्ये परळीची जागा शरद पवारांच्या पक्षाकडं आहे.
( नक्की वाचा : 'तुम्ही जे पेरलं ते उगवलं' बजरंग सोनावणेंचा पंकजा मुंडेंवर जोरदार निशाणा )
कोण आहेत फड?
गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुंटे यांच्या विजयात राजेभाऊ फड यांचा मोठा वाटा होता. ते राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी युवक प्रदेशाध्यक्ष तसंच गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावईही आहेत. 2016 पासून ते राजकारणात सक्रिय आहेत.फड यांची भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचे विश्वासू म्हणूनही ओळख आहे. त्यांची आई दोनदा तर राजेभाऊ फड हे एकदा कन्हेरवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच राहिलेले आहेत.
काय आहे परळीचं समीकरण?
धनंजय मुंडे हे सध्या परळी विधानसभाचे आमदार आहेत पंकजा मुंडे यांचा लोकसभेच्या झालेल्या पराभवानंतर भाजपने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे. राजेभाऊ फड हे विधानसभेच्या मैदानात उतरल्यास धनंजय मुंडे यांना होमग्राऊंडवर तगडं आव्हान मिळू शकतं.