PM Modi Rajya Sabha Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिषणावरील चर्चेला राज्यसभेत उत्तर दिलं. पंतप्रधानांनी सांगितलं की 10 वर्ष केंद्रात सत्तेत राहिल्यानंतर पुन्हा एकदा एखाद्या सरकारचं सत्तेत पुनरागमन झालं आहे. भारतीय लोकशाहीच्या इतिहासात हे 6 दशकांनंतर घडलंय. ही एक असमान्य घटना आहे. देशातील नागरिकांनी सरकारच्या कामगिरीला प्राधान्य दिलंय. पण, हा जनादेश काही जणांना समजला नाही. देशातील नागरिकांनी विश्वासाच्या राजकारणाला पसंती दिली आहे. भविष्यातील संकल्पांसाठी त्यांनी आमची निवड केलीय. आमच्या सरकारला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. आणखी 20 वर्ष बाकी आहेत. गेली 10 वर्ष आमच्यासाठी 'एपेटाइजर' होते. 'मेन कोर्स' आता सुरु होतोय. पंतप्रधान मोदींच्या भाषणांच्या दरम्यान विरोधकांनी अडथळा आणत राज्यसभेतून सभात्याग केला.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले पंतप्रधान?
पंतप्रधानांनी या भाषणात काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांच्यावर जोरदार टीका केल्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. 'या लोकांना सरकार ऑटो पायलट आणि रिमोट पायलटमध्ये चालवण्याची सवय होती. त्यांना काम करण्यावर विश्वास नव्हता, फक्त प्रतीक्षा कशी करावी हे त्यांना माहिती आहे,' असं पंतप्रधानांनी सांगितलं.
पंतप्रधानांनी हे वक्तव्य सोनिया गांधी यांना उद्देशून केलं होतं. मनमोहन सिंग यांचं सरकार पडद्याआडून चालवण्याचा आरोप त्यांच्यावर भाजपानं अनेकदा केला आहे. आम्ही मेहनत करण्याची कोणतीही कसर सोडलेली नाही. आपली स्वप्न पाहता ही 10 वर्ष फक्त 'एपेटाइजर' होते 'मेन कोर्स' आत्ता सुरु झाला आहे, असं पंतप्रधानांनी सांगितलं.
( नक्की वाचा : बालबुद्धी, शोले की मौसी... PM मोदींनी राहुल गांधींवर केलेल्या थेट हल्ल्यातील 5 प्रमुख मुद्दे )
विरोधकांनी सभात्याग का केला?
पंतप्रधांनाच्या या भाषणात राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे यांना हस्तक्षेप करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी विरोधी पक्षांच्या खासदारांनी केली. 'एलओपी को बोलने दो' अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. खर्गेंनीही त्यांना हस्तक्षेप करण्याची मागणी वारंवार केली. त्यानंतर विरोधकांनी 'झूठ बोलना बंद करो (खोटं बोलू नका), शर्म करो (लाज वाटू द्या) अशा घोषणा सुरु केल्या. विरोधकांची ही कृती योग्य नाही. मी या असंसदीय कृतीचा तीव्र निषेध करतो, कृपया तुमच्या जागेवर बसावं असं राज्यसभा अध्यक्ष जगदीश धनकड यांनी यावेळी विरोधकांना सुनावलं.
विरोधकांची घोषणाबाजी पाहून पंतप्रधांनी सरकारची उपलब्धी सांगणारं त्यांचं भाषण थांबवलं. 'माननीय अध्यक्ष, आज संपूर्ण देश पाहात आहे. खोटं पसरवणाऱ्यांना सत्य ऐकण्याची हिंमत नाही. त्यांनीच उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं ऐकण्याची सहनशक्ती त्यांच्यात नाही. हा वरिष्ठ सभागृहाचा अपमान आहे. लोकांनी त्यांचा पराभव केला आहे. आता त्यांना घोषणाबाजी करण्याशिवाय काहीही पर्याय नाही,' असं पंतप्रधानांनी विरोधकांना म्हणाले.
( नक्की वाचा : भाषण सुरु असतानाच बसले मोदी, राहुल गांधींवर भडकले अध्यक्ष! नेमकं काय झालं? )
मणिपूरवर काय म्हणाले पंतप्रधान?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभेतील भाषणाच्या दरम्यान मणिपूरवर बोला अशी मागणी विरोधक सतत करत होते. पंतप्रधानांनी राज्यसभेत मणिपूरमधील घटनेचा उल्लेख केला. 'मणिपूरमधील कार्यालयं उघडी आहेत. तिथं परीक्षा होत आहेत. पण काही लोकं मणिपूरच्या आगीत तेल ओतण्याचं काम करत आहेत. मणिपूरमधील परिस्थिती सामान्य होण्यासाठी सरकार सतत प्रयत्न करत आहे. तिथं 11 हजार FIR दाखल करण्यात आल्या आहेत. 500 पेक्षा जास्त जणांना अटक केलं आहे. मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना सातत्यानं कमी होत आहेत, हे आपल्याला मान्य केलं पाहिजे.
मणिपूरच्या बहुतेक भागात नेहमीप्रमाणे शाळा, कॉलेज कार्यलायं सुरु आहेत. राज्यात परीक्षा होत आहेत. जी लोकं मणिपूरच्या आगीत तेल ओतण्याचं काम करत आहेत त्यांनी ही कामं बंद करावीत अशी सूचना मी देतो. मणिपूरमधील परिस्थिती सध्या गंभीर आहे. एनडीआरएफच्या दोन तुकड्या तिथं पाठवण्यात येत आहेत, असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं.