
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. पडळकर हे वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी आता जयंत पाटील यांना लक्ष करत ते एक किरकोळ माणूस आहे. शिवाय ते सत्ते शिवाय राहू शकत नाही. सत्तेसाठी त्यांची लाचार होण्याची तयारी आहे. त्यांची ताकद संपलेली आहे, असं वक्तव्य भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी केलं आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या आधीही पडळकर यांनी शरद पवारांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नुकतीच भेट झाली. याबाबत आपल्याला काही विशेष वाटलं नाही असं पडळकर म्हणाले. जयंत पाटील हा काही लढाऊ माणूस नाही. वडिलांच्या कृपेने ते आमदार आहे. त्यामुळे संघर्ष आणि जयंत पाटील यांचा काही एक संबंध नाही असंही ते म्हणाले. सत्ते शिवाय ते राहू शकत नाहीत. सत्तेसाठी लाचार होण्याची त्यांची तयारी आहे असं ही पडळकर म्हणाले. जयंत पाटील आता पूर्णपणे शरण आले आहेत. हे लोकांनाही कळलं आहे असा दावा पडळकर यांनी केला.
देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांनी प्रभावीपणे लोकांची बाजू मांडली. आता विरोधकांकडे तसा सक्षम माणूसच नाही, असा टोलाही त्यांनी पाटील यांचे नाव न घेता लगावला. मी चाळीस हजार मतांनी निवडून आलो आहे. जयंत पाटील फक्त अकरा हजार मतांनी निवडून आले आहेत. जयंत पाटलांच्याकडे आता ती ताकद राहीली नाही. जयंत पाटील म्हणजे कासेला मोठी, पण दूध चोरणारी म्हैस असा उल्लेख त्यांनी केला.
जयंतराव हा किरकोळ माणूस आहे. पण महाराष्ट्रातील आमच्या काही लोकांना हे अजून लक्षात येत नाही. जयंत पाटलांच्या विरोधात सक्षमपणे कोण लढलं असतं, तर 50 हजार मतांनी ते पडले असते. जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस आहे. त्यांचा आता कुठेही प्रभावी गट राहिला नाही. इस्लामपूर पुरती त्यांची ताकद मर्यादित राहिली आहे असं ते म्हणाले. तिथे सुद्धा लोकांनी त्यांना काठावर आणून ठेवलं आहे. पुढच्या वेळी सदाभाऊ खोत किंवा त्यांचा मुलगा सागर जरी लढले तरी जयंत पाटील यांचा पराभव होऊ शकतो, असं भाकित ही त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world