प्रकाश आंबेडकर काढणार आरक्षण बचाव यात्रा, सरकारकडं केल्या 6 मोठ्या मागण्या

Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारकडं 6 मोठ्या मागण्या केल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
छत्रपती संभाजीनगर:

Prakash Ambedkar : मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा वाद राज्यात चांगलाच पेटलाय. मराठ्यांना सगेसोयऱ्यांसह आरक्षण द्यावं ही मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलीय. या विषयावर त्यांनी सरकारला दिलेली 13 जुलैची डेडलाईन संपली आहे. त्यानंतर जरांगे यांनी 20 जुलैपासून आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा केलीय. त्याचबरोबर समर्थकांसह मुंबईत धडकण्याचा इशारा दिलाय. दुसरिकडं ओबीसी नेते देखील या विषयावर आक्रमक आहेत. मराठ्यांना सरसकट ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास त्यांचा विरोध आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणात उडी घेतलीय. आंबेडकर यांनी 25 जुलैपासून राज्यात 'आरक्षण बचाव यात्रा' काढणार असल्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर त्यांनी राज्य सरकारकडं 6 महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. 

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले आंबेडकर?

प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली. 'ओबीसी संघटनांनी हा लढा आपण हातात घ्यावा ही विनंती केली होती. सध्याची परिस्थिती अत्यंत भयानक आहे. काही जण नामांतर आंदोलनाची आठवण करुन देत आहेत. मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद श्रीमंत मराठ्यांनी लावला आहे. हा वाद काय वळण घेईल याची ओबीसी संघटनांना भीती आहे,' असं आंबेडकर यावेळी म्हणाले. 

महाविकास आघाडीला सवाल

प्रकाश आंबेडकर यांनी या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीलाही महत्त्वाचा प्रश्न विचारला. 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षाचे कोणतेही नेते उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांची भूमिका काय हा प्रश्न आम्ही विचारला आहे. ओबीसीमधून आरक्षण द्यावे, यावर राजकीय पक्षांची भूमिका काय आहे?' असा सवाल आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला केलाय. 

( नक्की वाचा : 'महाराष्ट्रात संवैधानिक घोटाळा सुरु आहे', OBC नेते लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप )
 

राज्य सरकारकडं मागण्या

प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी राज्यसरकारकडं काही महत्त्वाच्या मागण्या केल्या. ओबीसींच्या आरक्षण वाचलं पाहिजे. एससी एसटी विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप डबल करावी. ओबीसीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा एससी एसटीची स्कॉलरशिप तशीच्या तशी लागू करावी. घाई गर्दीमध्ये कास्ट फॉर्म देण्यात आलाय तो रद्द करावा. कुणबींना आरक्षण मिळणारच. आरक्षणात एससी, एसटी आणि ओबीसींना पदोन्नती मिळावी या 6 मागण्या आंबेडकरांनी सरकारकडं केल्या. 

Advertisement

( नक्की वाचा : 'एक हजार टक्के माझं मत फुटलं नाही,' काँग्रेसच्या 'त्या' आमदारानं सर्व सांगितलं! पटोलेंना म्हणाले... )
 

कशी निघणार यात्रा?

प्रकाश आंबेडकर यांनी 25 जुलैपासून 'आरक्षण बचाव यात्रा' काढणार असल्याचं जाहीर केलं. मुंबईच्या दादरमधील चैत्यभूमीपासून या यात्रेला सुरुवात होणार आहे. कोल्हापूर, सांगली, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, जालना असा या यात्रेचा प्रवास असेल. 7 किंवा 8 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये या यात्रेचा समारोप होईल, असं आंबेडकरांनी जाहीर केलं.