महायुतीला राज्यात प्रचंड बहुमत मिळाले आहे. पण अजूनही सत्ता स्थापनेचा साधा दावाही करण्यात आला नाही. शपथविधी 5 डिसेंबरला होणार आहे असं सांगितलं जात आहे. पण मुख्यमंत्री कोण हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. मुख्यमंत्री भाजपचा होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. त्यावरू एकनाथ शिंदे हे नाराज आहेत. शिवाय त्यांना हवी असलेली खातीही दिली जात नाही. त्यामुळे पेच निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. त्यात आता काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप पक्षश्रेष्ठींवर गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
2019 साली विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणूक लढवली होती. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजप श्रेष्ठींनी मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता. मात्र निवडणूक निकालानंतर भाजपने तो शब्द पाळला नाही. उद्धव ठाकरे यांची फसवणूक केली. असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. तसाच प्रकार आताही भाजपने केला आहे. विधानसभा निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर लढवली गेली. पण निवडणूक निकालानंतर त्यांना बाजूला सारण्यात आलं. त्यांचीही भाजपने फसवणूक केल्याचे चव्हाण म्हणाले. त्यामुळेच अजूनही सरकार स्थापन होत नाही. महायुतीत अंतर्गत वाद असल्याचा दावाही चव्हाण यांनी यावेळी केला.
या विधानसभा निवडणुकीत लोकशाहीचा मुडदा पाडला गेला. सत्तेचा गैरवापर केला गेला. पोलिसांच्या गाडीतूनच पैसे वाटले जात होते असा आरोपही चव्हाण यांनी केला. पोलिसांनी दमदाटी करून मतदान करून घेतलं असं ही ते म्हणाले. पुण्यात ते बाबा आढावांच्या भेटीला आले होते त्यावेळी ते बोलत होते. निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. निवडणूक प्रक्रियेवरच संशय निर्माण होत असेल तर त्यांनी प्रक्रिया बदलली पाहिजे. नाही तर सगळं सिद्ध करून दाखवलं पाहिजे असंही ते म्हणाले. सध्याच्या निवडणूक प्रक्रीयेवर आमचा विश्वास राहील नाही. मतदान झालं पण असं होत नाही असंही ते म्हणाले.
बाबा आढाव यांनी लोकशाही वाचवण्यासाठी जे उपोषण केले त्याची नोंद संपूर्ण देशाने घेतली आहे असं यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. पक्ष आणि मी स्वतः बाबा आढाव यांना पाठिंबा देत आहे असंही त्यांनी सांगितलं. विधानसभेचे जे निकाल आले ते अनेपेक्षित होते. आपण सात निवडणुका लढवल्या आहेत. पण असं या आधी कधीही झालं नाही. हवा उलट्या दिशेने होती. लोकसभेला जनतेने 65 टक्के जागा दिल्या होत्या. महायुतीच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीवर फेल म्हणून जनतेने शिक्का मारला होता. केवळ 4 महिन्यात इतका मोठा बदल होईल असं दिसत नव्हतं असंही ते म्हणाले. सर्वांना आत्मविश्वास होता की राज्यात सत्ता बदल होणार आहे. पण तसं झालं नाही. हे सर्व संशयास्पद असल्याचंही ते म्हणाले.