तोंडाला काळे फासणार ! ठाकरेंच्या शिवसेना नेत्याचा राहुल गांधींना इशारा, काँग्रेस नेते संतापले

Shivsena UBT Leader Warning to Rahul Gandhi: बाळा दराडे यांनी म्हटले की, नाशिक कोर्टाने राहुल गांधींना समन्स बजावले असून येत्या एक-दोन महिन्यात ते नाशिकला येणार असल्याची मला माहिती मिळाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
नाशिक:

प्रांजल कुलकर्णी

स्वातंत्र्यवीर सावरकरांची 28 मे रोजी जयंती साजरी केली जाते. जयंतीच्या दिवशी सावरकरांवरूनच महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडण्याची चिन्हे दिसू लागली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात काही विधाने केली होती. या विधानांमुळे त्यांच्याविरोधात महाराष्ट्रातील विविध ठिकाणी तक्रारी, याचिका दाखल करण्यात आली होती. नाशिकमध्ये मनोज पिंगळे नावाच्या वकिलांनी राहुल गांधींविरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेसंदर्भात बोलत असताना ठाकरेंच्या शिवसेनेच्या नाशिक शहर उपप्रमुख बाळा दराडे यांनी राहुल गांधींना इशारा दिला आहे. नाशिकमध्ये आलात तर तोंडाला काळे फासून असा इशारा दराडेंनी दिला आहे. राहुल गांधी यांच्या ताफ्यावर दगडफेकीचाही इशारा त्यांनी दिला आहे. मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे मागे हटणार नाही, असेही दराडेंनी म्हटले आहे. 

बाळा दराडे यांनी म्हटले की, नाशिक कोर्टाने राहुल गांधींना समन्स बजावले असून येत्या एक-दोन महिन्यात ते नाशिकला येणार असल्याची मला माहिती मिळाली आहे. राहुल गांधींना इशारावजा विनंती आहे की महाराष्ट्रात, नाशिकमध्ये येण्याच्या आधी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची, हिंदुत्ववाद्यांची माफी मागावी. माफी न मागता ते नाशिकमध्ये आले तर त्यांच्या तोंडाला आम्ही काळे फासू, आणि जर ते शक्य झाले नाही तर त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करू. ही माझी वैयक्तिक भूमिका आहे. उद्धवसाहेबांचा आदेश अंतिम आहे ते जो आदेश देतील तो मला मान्य असेल. 

धमक्या देणाऱ्यांना पाहून घेऊ! काँग्रेसची आक्रमक भाषा

दराडे यांनी दिलेल्या इशाऱ्यासंदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, "कोणत्याही भ्याड धमक्यांना राहुल गांधी घाबरणार नाही. कोणी जर धमक्या देत असतील तर राहुल गांधी सोडा आमचा सामान्य कार्यकर्त्यांना पुरून उरेल."  राहुल गांधींनी सावरकरांबद्दल अपशब्द काढलेले नाही, त्यांनी इतिहासातील दाखल दिले आहेत. अरुण शौरी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते, त्यांनी सावरकरांवर एक पुस्तक लिहिले आहे. जे राहुल गांधी बोलले आहेत तेच शौरी यांनी पुस्तकात लिहिले आहे. धमक्या देणाऱ्यांना आम्ही पाहून घेऊ. महाराष्ट्र काँग्रेस कमिटी अशा आरोपांना निपटून घेईल. असे सपकाळ यांनी म्हटले. 

नक्की वाचा: स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे तेज, सावरकर म्हणजे त्याग!! पंतप्रधानांसह अनेकांनी वाहिली आदरांजली

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली सावरकरांना आदरांजली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी स्वातंत्र्यवीर सावरकरांना आदरांजली वाहिली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करुन मुख्यमंत्र्यांनी विनम्र अभिवादन केले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथील निवासस्थानी त्यांच्या छायाचित्रास पुष्पहार घालून अभिवादन केले.

Advertisement