Raigad News: भाजप-शिवसेना शिंदे गटाची युती फुटली, निवडणुकीत भाजपची सरशी

रायगडमध्ये या आधी शिवसेना शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या उभा वाद निर्माण झाला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins
रायगड:

मेहबूब जमादार 

राज्यात सध्या महायुतीचे सरकार आहे. त्यात भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सहभागी आहे. राज्यस्तरावर जरी महायुती असली तरी स्थानिक स्तरावर मात्र या तिन्ही पक्षात विस्तवही जात नसल्याची स्थिती आहे. कधी शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी, तर कुठे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप हा वाद पाहायला मिळत आहे. त्यात आता भर म्हणून की काय शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्येही असाच वाद समोर आला आहे. हा वाद रायगड जिल्ह्यात झालेला पाहायला मिळाला आहे. 
 
रायगड जिल्ह्यातील पाली नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीत बिघाडी पाहायला मिळाली आहे. रायगड जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या  अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना आमने-सामने आले होते. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पराग मेहता यांनी नगराध्यक्ष निवडणुकीत विजय मिळविला आहे. त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला. 

नक्की वाचा - Eknath Shinde: शिंदे सेनेची मुंबई महापालिकेसाठी 21 नेत्यांची समिती जाहीर, कुणाचा पत्ता कट? यादी आली समोर

या निवडणुकीत  त्यांना 15 पैकी 9 मते मिळाली. तर शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवार कल्याणी दबके यांना अवघी 5 मते मिळाली. एक मत तटस्थ राहिले. निवडणूक विजयानंतर भाजप आणि मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी मेहता यांना उचलून घेतले. गुलाल उधळत, ढोल ताशा वाजवत मोठ्या जल्लोषात विजयोत्सव साजरा केला. नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता विजयी झाले. पाली नगराध्यक्षपदाची निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली होती. रायगडमधील हा पराभव मंत्री भरत गोगावले यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. एकूण पक्षीय बलाबल मध्ये भाजपाचे 4, राष्ट्रवादी व शिंदे गटाचे प्रत्येकी 5 व शेकापचा 1 नगरसेवक असे एकूण 15 नगरसेवक पाली नगरपंचायत मध्ये होते. राष्ट्रवादीचे 5, भाजपचे 4 असे एकूण 9 मतदान भाजपाच्या पराग मेहता यांना पडले. तर शिंदे गटाच्या कल्याणी दबके यांना पक्षाची 5 मते पडली व शेकाप च्या एक नगरसेवक तटस्थ राहिले.

 Nepal Protest : नेपाळमध्ये आंदोलकांचा हैदोस; माजी PM च्या पत्नीचा होरपळून मृत्यू, अर्थमंत्र्यांवर हल्ला, Video

रायगडमध्ये या आधी शिवसेना शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या उभा वाद निर्माण झाला होता. जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे तीन आमदार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे या मंत्री आहेत. या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा वाद अजूनही सुटलेला नाही. त्यात आता शिवसेना शिंदे गट विरुद्ध भाजप अशी स्थितीही निर्माण झाली आहे. शिवसेना शिंदे गटाने जिल्ह्यात एकाच वेळी भाजप आणि राष्ट्रवादीला अंगावर घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्याचा फटका सेनेला बसणार की फायदा होणार याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.