Raj Thackeray Speech : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शुक्रवारी मीरा रोडमध्ये सभा झाली. त्यांनी या भाषणात हिंदी भाषेची सक्ती खपवून घेणार नाही, असा इशारा राज्य सरकारला दिला. त्याचबरोबर या विषयावर काही दिवसांपूर्वी ठाकरेंवर टीका करणारे भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनाही राज यांनी इशारा दिला आहे.
'दुबे मुंबई मे आना....'
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी भाषिकांना मारहाण करु असं वक्तव्य केलं होतं. त्यावर कारवाई झाली का? असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला. हे कुणाच्या तरी पाठिंब्यानं या पद्धतीचं वक्तव्य केलं होतं. त्याला राज ठाकरे यांनी उत्तर दिलं.
दुबे तुम्ही मुंबईमध्ये या, तुम्हाला मुंबईच्या समुद्रामध्ये बुडवून मारु असं आव्हान राज यांनी यावेळी दिलं. आम्ही कडवट हिंदू आहोत पण, हिंदी नाही. हिंदीची सक्ती केली तर माझ्यासारखा कडवट मराठी सापडणार नाही, असा इशारा राज यांनी यावेळी दिला.
आम्ही गुलाम नाही. या प्रांतावर आमचा अधिकार आहे. मराठे अटकेपार पोहोचले होते, हा इतिहास आहे. तो महाराष्ट्र हतबल आहे का? बाकीचे माणसं बाहेरुन आले ती तुमच्यासमोर रुबाब करणार... स्वत:हून काही करण्याची गरज नाही. पण, असा कुणी माज घेऊन आला तर त्याला ठेचायचा म्हणजे ठेचायचाच तुमची सत्ता लोकसभेत आणि विधानभवनात आहे. आमची सत्ता रस्त्यावर आहे, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
( नक्की वाचा : Raj Thackeray: '.... तर राज्यातील शाळाही बंद करेन', राज ठाकरेंचा इशारा, पाहा संपूर्ण भाषण, Video )
काय म्हणाले होते दुबे?
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या हिंदी मराठी वादावर वक्तव्य केलं होतं. "जर मुंबईत हिंदी भाषिकांना मारणाऱ्यांमध्ये हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा. आपल्या गल्लीत कुत्राही वाघ होतो. कोण कुत्रा कोण वाघ हे तुम्हीच ठरवा, असं ट्वीट निशिकांत दुबे यांनी केलं होतं.