- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्याचा सल्ला दिला आहे
- मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोदींना पत्र लिहून त्यांच्या आर्थिक धोरणांवर आणि निव्वळतेवर सवाल उपस्थित केले आहेत
- राज ठाकरे म्हणाले की मोदी मन की बात सोडावी आणि तज्ज्ञांच्या मन की बात ऐकावी.
पंतप्रधान मोदी यांनी देशातील जनतेला पेट्रोल डीझेल कमी वापरण्याचा सल्ला दिला आहे. शिवाय सोने खरेदी करू नका, परदेशावारी टाळा या आणि या सारख्या अन्य गोष्टी सांगितल्या आहेत. त्यानंतर त्यांच्यावर विरोधी पक्षांनी टिकेची एकच झोड उठवली आहे. त्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा समावेश आहे. त्यांनी तर पंतप्रधान मोदी यांना एक खरमरीत पत्र लिहीलं आहे. या पत्रातून त्यांनी अनेक प्रश्न ही उपस्थित केले आहे. त्यांनी हे पत्र आपल्या एक्स प्लॅटफॉर्मवर ही टाकले आहे. त्यांच्या पत्राची सध्या राजकीय वर्तूळात जोरदार चर्चा सुरू आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात काय म्हटलं आहे ते पाहूयात. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वी तमाम भारतीयांना काटकसर करण्याचं आवाहन केलं. बरं, मग स्वतः पंतप्रधान आणि त्यांचे सगळे सहकारी देशभर काही शे गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणुका काढत आहेत. स्वतःवर फुलं उधळून घेत आहेत, त्याचं काय करणार आहात आपण ? असा सवाल राज ठाकरे यांनी थेट मोदींना केला आहे. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि इतर राज्यांच्या निवडणुकीत प्रचार, रोड शो करताना आणि देशभरातून लाखो माणसं त्या त्या राज्यात नेताना जे कोट्यवधी लिटर्स पेट्रोल, डिझेल वाया गेलं तेंव्हा हे का नाही सुचलं? असा प्रश्न ही त्यांनी केलाय.
मग आमच्याकडून चूक झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून, यापुढे माझ्यासकट कोणीही काही असं करणार नाही असं सांगणार आहात का? अशी विचारणा ही त्यांनी केली आहे. चुका तुमच्या, आणि त्याचा भुर्दंड जनतेला का? माझी पंतप्रधानांना विनंती आहे की नैतिक आवाहन आणि त्याचा भार लोकांनी सहन करायचा हे सगळं बास झालं. एकदा मान्य करू या की अर्थव्यवस्था वरून सुदृढ आणि आतून कमकुवत झाली आहे. यांचं नुसतं खापर इराण - इस्रायल युद्धावर टाकू नका ! आपण पंतप्रधान झाल्यापासून रूपयाचं अवमूल्यन मोठ्या प्रमाणात झालं, हे कशामूळे झालं ते सांगा! असा थेट सवाल त्यांनी मोदींना केला आहे.
(नक्की वाचा : PM मोदींचे WFH आणि पेट्रोल वाचवण्याचे आवाहन देशापुढील मोठ्या संकटाची चाहूल आहे का? वाचा सविस्तर)
या पुढे जावून ही राज ठाकरे म्हणतात तुमची मन की बात खूप झाली. आता खऱ्याखुऱ्या अर्थतज्ज्ञांची मन की बात पण ऐका. तुम्ही काय पाऊलं उचलणार आहात हे जनतेला सांगा. संसदेला सांगा. पंतप्रधानांनी स्वतःच्या पक्षापासून काटकसर सुरु करावी आणि हे सगळं कसं निस्तरणार हे देशाला सांगावं! राज ठाकरे यांच्या या पत्राची सध्या जोरदार चर्चा होत आहे. त्यांनी या पत्राच्या माध्यमातून काही टोकदार प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याची उत्तर त्यांना मिळतील का हे आता पाहावं लागणार आहे. पण राज यांनी मोदी यांच्या विरोधात थेट भूमीका घेतल्याचं या पत्रावरून दिसत आहे.