राकेश गुडेकर
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं. त्यानंतर शिवसेना दोन गटात विभागली गेली. शिंदे गट आणि ठाकरे गट. या दोन्ही गटातनंतर शाखां वरूनही वाद झाले. शाखांवर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. शाखांवर ताबा मिळवण्याचे वाद आजही पाहायला मिळतात. मात्र महाराष्ट्रातली अशी एक शिवसेनेची शाखा आहे जी या सर्वाला अपवाद आहे. कारण शिवसेनेच्या दोन्ही गटाचे नेते या एकाच शाखेत बसून आपला कारभार चालवणार आहेत. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. या शाखेचा ताबा मिळवण्यावरून कुठला ही वाद झाला नाही हे ही विशेष म्हणावे लागेल.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ही शाखा रत्नागिरी शहरात आहे. शहराच्या साळवी स्टॉप इथं शिवसेनेची शाखा आहे. ही शाखा सर्वात जुनी समजली जाते. शिवसेना एकसंध असताना याच शाखेतून कारभार केला जात होता. मात्र आता शिवसेनेत फुट पडली आहे. रत्नागिरीचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी नुकताच ठाकरे सेनेला सुरूंग लावला. ठाकरे गटाचे तालुका प्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांना शिंदे गटात घेतले. त्यानंतर साळवी यांनी याच शाखेत बसून आपले काम सुरू केले.
ट्रेंडिंग बातमी - CMO news: मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळविणे होणार अधिक सोपे
बंड्या साळवी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने शेखर घोसाळे यांची तालुका प्रमुख म्हणून नियुक्ती केली. शेखर घोसाळे यांची निवड झाल्यानंतर बुधवारी शहरातील साळवी स्टॉप येथील शिवसेनेच्या शाखेत त्यांचं ही जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करीत जोरदार घोषणाबाजी ही करण्यात आली. यावेळी ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले माजी तालुकाप्रमुख प्रदीप साळवी हे देखील सध्या याच शाखेत बसून कारभार चालवत आहेत. त्यांनी देखील शाखेत येऊन घोसाळे यांना शुभेच्छा दिल्या. शिवाय आम्ही दोघेही याच शाखेत बसून नागरिकांच्या समस्या सोडविणार असल्याचं दोघांनीही सांगितलं. त्याच बरोबर दोघांनीही आपल्यात कोणताही वाद नसल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे शिवसेना दोन शाखा एकच हे महाराष्ट्रातील अनोखं उदाहरण रत्नागिरीत पाहायला मिळत आहे.