प्रसाद शिंदे, प्रतिनिधी
Karjat-Jamkhed Politics: अहिल्यानगर जिल्ह्यातील नव्हे, तर राज्यातील एक महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्जत-जामखेड मतदारसंघात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. या मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या राजकारणाला शह देण्यासाठी, विधानपरिषद सभापती राम शिंदे यांनी नुकतीच राजेंद्र तात्या फाळके यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि त्यांच्यासोबत सुमारे 2 तास चर्चा केली.
नेमकं काय घडलं?
गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये आमदार रोहित पवार हे कर्जत-जामखेडमधून विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयात महत्त्वपूर्ण वाटा असणारे अहिल्यानगर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून राजेंद्र तात्या फाळके यांच्याकडे पाहिले जात होते.
मात्र, काही दिवसांपूर्वी राजेंद्र तात्या फाळके यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. या राजीनाम्यानंतर लगेचच विधानपरिषद सभापती राम शिंदे यांनी फाळके यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतल्याने कर्जत-जामखेडच्या राजकारणात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. फाळके यांनी पक्ष सोडल्यानंतर राम शिंदे यांनी घेतलेली ही भेट आगामी राजकारणाला नवी दिशा देणारी ठरू शकते.
( नक्की वाचा : RSS Diwali Message: संघ स्वयंसेवक दिवाळी शुभेच्छा देताना 'या' 5 गोष्टींचा उल्लेख का करत आहेत? जाणून घ्या अर्थ )
आगामी नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. राजेंद्र तात्या फाळके जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत की नाही, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. परंतु, सभापती राम शिंदे यांनी भेट घेतल्यामुळे फाळके भाजपच्या वाटेवर आहेत का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या भेटीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेडमधील राजकारणाला कुठेतरी शह देण्याचे काम झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. राम शिंदे आणि राजेंद्र फाळके यांच्या भेटीमुळे कर्जत-जामखेडच्या राजकारणाच्या एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे.