Sameer Bhujbal Minister Post: महाराष्ट्राच्या राजकारणात राज्यसभेच्या निवडणुकीनंतर सुरू झालेले नाराजीनाट्य आता एका वेगळ्याच वळणावर आले आहे. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने आणि त्यांच्या पुतण्याला म्हणजेच समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भुजबळ कुटुंब प्रचंड नाराज असल्याच्या चर्चा आहे. मात्र, आता स्वतः समीर भुजबळ यांनी या संपूर्ण प्रकरणावर मौन सोडत पडद्यामागे नक्की काय घडले, याची धक्कादायक इनसाईड स्टोरी समोर आणली आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीचा आणि भाजपच्या बड्या नेत्यांनी दिलेल्या शब्दाचा मोठा गौप्यस्फोट केला आहे, ज्यामुळे या राजकीय नाट्याला आता एक नवीनच ट्विस्ट मिळाला आहे.
मंत्रिपदाच्या शपथेसाठी वेळ कमी पडला
समीर भुजबळ यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्येआपण किंवा छगन भुजबळ नाराज नसल्याचा दावा केला आहे. मात्र, त्यांनी पडद्यामागील ज्या घडामोडी सांगितल्या, त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. समीर भुजबळ म्हणाले की, माझी मुख्यमंत्र्यांसोबत मंत्रिपदाबाबत थेट चर्चा झाली होती. सर्व काही ठरले होते, मात्र अगदी शेवटच्या क्षणी मंत्रिपदाच्या शपथेसाठी वेळ अतिशय कमी उरला होता.
त्यामुळे तांत्रिक अडचणींमुळे तो शपथविधी पार पडू शकला नाही. पुढे बोलताना त्यांनी सर्वात मोठा गौप्यस्फोट केला की, मला भाजपकडून स्पष्ट शब्द देण्यात आला आहे. ज्यावेळी राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल किंवा फेरबदल केला जाईल, त्यावेळी मला मंत्रिमंडळात नक्की संधी दिली जाईल.
( नक्की वाचा : Chhagan Bhujbal: नाराज भुजबळ राष्ट्रवादीला 'जय महाराष्ट्र' करणार? समर्थकांनी दिले राजकीय भूकंपाचे संकेत )
छगन भुजबळ पुतण्याच्या मंत्रिपदासाठी का होते आग्रही?
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यसभेसाठी प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय राजेंद्र जैन यांना संधी दिली, तर विधानपरिषदेवर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांना बिनविरोध निवडून आणले. पक्षात इतरांच्या मुला-बाळांना आणि नातेवाईकांना पदे मिळत असताना, भुजबळ कुटुंबाला मात्र डावलले जात असल्याची भावना निर्माण झाली होती.
छगन भुजबळ स्वतः राज्यसभेवर जाण्यास इच्छुक होते, पण त्यांनी आपले राज्यातील मंत्रिपद समीर भुजबळ यांना देण्याची अट ठेवली होती, सध्या समीर भुजबळ यांचे मंत्रिपद वेटिंगवर असले, तरी भविष्यात त्यांना संधी मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
( नक्की वाचा : Dombivli News : मलंगगड मुक्तीचा सर्वात मोठा आवाज; 'या' एका निर्णयाने सुटणार वर्षानुवर्षांचा प्रलंबित प्रश्न! )
25 वर्षांचा जुना खेळाडू
छगन भुजबळ यांनी आपण बुद्धिबळाचा नाही तर कबड्डीचा खेळाडू असल्याचे सांगत थेट आव्हान दिले होते. त्यानंतर आता समीर भुजबळ यांनी आपल्या राजकीय प्रवासाची आठवण करून दिली आहे. ते म्हणाले की, छगन भुजबळ साहेबांची संसदेत जाण्याची इच्छा होती, कारण यापूर्वी 2 ते 3 वेळा त्यांची ही संधी हुकली होती. त्यामुळे माझा राज्यसभेवर जाण्याचा कधीच विषय नव्हता.
मी लहानपणापासून राजकारणात आहे, आधी शिवसैनिक म्हणून काम केले आणि नंतर साहेबांसोबत राष्ट्रवादीत आलो. 1999 सालापासून म्हणजेच गेली 25 वर्षांपेक्षा जास्त काळ मी पक्षाचा झेंडा बनवण्यापासून ते दादर शिवाजी पार्क आणि षण्मुखानंद हॉलमधील सभांचे नियोजन करण्यापर्यंत सर्व कामे केली आहेत. त्यामुळे पक्षाकडे मंत्रिपद मागण्याचा मला पूर्ण अधिकार आहे.