विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का दिला आहे. गोराईच्या माजी नगरसेविका आणि शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोशी यांनी शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आदित्य ठाकरेंच्या अतिशय जवळच्या नगरसेविका म्हणून त्यांची ओळख होती. त्यामुळे त्यांना एकदा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाची तर दोन वेळा शिक्षण समितीच्या अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. त्यांनी शिवसेना ठाकरे गट सोडण्याचे मोठे कारणही सांगितले आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेसाठी केलेले काम मोठे आहे. त्यांच्या कामाचा धडाका मोठा आहे. शिवाय महिला सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण सारखी योजना आणली. यातून प्रभावीत होवून आपण शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत असल्याची प्रतिक्रीया संध्या दोशी यांनी दिली आहे. शिवसेना ठाकरे गटात आपण नाराज नव्हतो. आपली कोणतीही तक्राही नाही. केवळ एकनाथ शिंदेंच्या काम करण्याच्या शैलीमुळे आपण शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ट्रेंडिंग बातमी - मोठी बातमी! मविआचं जागा वाटप ठरलं, मुंबईतल्या 99 टक्के जागांवर सहमती
संध्या दोशी या तीन वेळा गोराईतून नगरसेविका राहील्या आहेत. त्यात त्या एकदा प्रभाग समितीच्या अध्यक्ष ही राहील्या आहेत. तर दोन वेळा त्यांना शिक्षण समितीच्या अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधीही मिळाली आहे. माजी शाखा प्रमुख आणि असंख्य कार्यकर्त्यांसह त्या शिंदे गटात प्रवेश करत आहेत. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वात हा पक्ष प्रवेश होत आहे. संध्या दोशी यांनी या आधी शरद पवारां बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी काम केलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी ठाकरे गटाला लागेला हा मोठा धक्का आहे.
मुंबई उपनगरातला संध्या दोशी हा शिवसेनेचा एक चेहरा होता. त्या ठाकरे कुटुंबाच्या मर्जीतल्या होत्या. आदित्य ठाकरे यांच्या गटातील नगरसेविका म्हणून त्यांची ओळख होती. त्यामुळे पक्षानेही त्यांना वेळोवेळी संधी दिली. दरम्यान या पुढे एकनाथ शिंदे जी जबाबदारी देतील ती पार पाडू असे संध्या यांनी स्पष्ट केले आहे. आगामी विधानसभेला युतीचे काम करू असेही त्यांनी सांगितले. त्या ज्या मतदार संघातून महापालिकेवर निवडून जातात तो मतदार संघ विधानसभेला भाजपच्या वाट्याला गेला आहे. मात्र त्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री जो घेतील तो मान्य असेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.