BJP vs Shiv Sena: राज्यातील सत्तारुढ महायुतीमधील मंत्र्यांममध्ये विभागीय कामकाजावरील मतभेद उघड झाले आहेत. सामाजिक न्याय विभागातील कामकाजाच्या बैठका राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी परस्पर घेतल्याचा आरोप या विभागाचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी केलाय. त्यामुळे शिरसाट चांगलेच नाराज झाले आहेत. त्यांनी पत्र लिहून तशी नाराजी व्यक्त केली आहे.
नाराज संजय शिरसाट यांनी थेट राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना पत्र लिहून आपल्या विभागातील बैठक घ्यायची झाल्यास, बैठक माझ्या अध्यक्षतेखाली करावी असे पत्र लिहिले आहे. हे पत्र 'NDTV मराठी' च्या हाती आलं आहे.
( नक्की वाचा : Big News: राज्याच्या राजकारणात लवकरच मोठा भूकंप! काँग्रेसचा बडा नेता भाजपामध्ये प्रवेश करणार? )
सामाजिक न्याय विभागातील कामकाज मंत्री आणि राज्यमंत्री यांच्याच वाटप झाले असताना, आमदारांच्या पत्रावरून मिसाळ यांनी काही बैठका लावत अधिकारी आणि कर्मचारी यांना विविध निर्देश दिले होते, मात्र याबाबत शिरसाट यांना कल्पना नव्हती. त्यावर शिरसाट नाराज झाले आहेत.
या बैठकांची माहिती शिरसाट यांना मिळाल्यानंतर शिरसाट यांनी थेट राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली. इतकंच काय तर पत्रातून यापुढे आपल्याकडील विषयासंबधित आपणास बैठक घ्यावयाची असल्यास सदर बैठक माझ्या अध्यक्षतेखाली आयोजित करणे संयुक्त राहिल असे खरमरीत पत्रच लिहिले आहे.
सध्या शिरसाट यांच्या या पत्राची जोरदार चर्चा आहे. या पूर्वीही सामाजिक न्याय विभागातून लाडक्या बहिणीसाठी पैसे वळवल्याने शिरसाटांनी नाराजी व्यक्त केली होती.आता शिरसाटांच्या विभागातील बैठकाही राज्यमंत्री घेऊ लागल्याने भाजपकडून सेनेच्या मंत्र्यांना गृहित धरले जात आहे का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.