मुलाच्या 'कार'नाम्याचा बावकुळेंना फटका, भाजपा श्रेष्ठींनी दिले मोठे 'संकेत'

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचं नाव सध्या त्यांच्या मुलामुळे गाजतंय.

Advertisement
Read Time: 2 mins
नागपूर:

संजय तिवारी, प्रतिनिधी

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे  (Chandrashekhar Bawankule) यांचं नाव सध्या त्यांच्या मुलामुळे गाजतंय. बावनकुळे यांचा मुलगा संकेत यांच्या मालकीच्या ऑडी कारनं नागपूरमध्ये रविवारी मध्यरात्री धुमाकूळ घातला. या कारनं काही वाहनांना धडक दिली. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले. या प्रकरणावर सध्या राजकारण सुरु आहे. विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर आलेल्या असताना घडलेल्या या प्रकराचा मोठा फटका बावनकुळेंना बसण्याची शक्यता आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

संधी होती, हुकली ?

विधानसभा निवडणुकीत एक-एक जागा जिंकणे महत्त्वाचं आहे, असं भाजपाचं धोरण आहे. भाजपाच्या या धोरणानुसार कामठी मतदारसंघातून विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांच्या ऐवजी चंद्रशेखर बावनकुळेंना संधी होती. त्या दृष्टीनं बावनकुळे यांनी कामठी मतदार संघात संपर्क आणि बैठकांचे प्रमाण वाढवले होते. विधानसभा निवडणुकीत बावनकुळे किंवा त्यांच्या पत्नीला तिकीट मिळेल अशी अपेक्षा होता, पण, आता समीकरण बदललं आहे. 

मुलाच्या ऑडी प्रकरणाने परिस्थिती बदलली

संकेत बावनकुळेच्या ऑडी प्रकरणानंतर समीकरण बदलले आहे. पक्षश्रेष्ठींच्या कणखर भूमिकेमुळे बावनकुळे यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना तिकीट मिळण्याची सुतराम शक्यता नाही. 2019 मध्ये अचानक त्यांचे तिकीट कापण्यात आले होते त्यावेळी त्यांच्या स्थानी त्यांच्या पत्नीला उमेदवारी मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, निर्णय फिरवून पक्षाने सावरकर यांना उमेदवारी जाहीर केली होती. आता बावनकुळे यांची विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी पुन्हा हुकली आहे, अशी माहिती भाजपाच्या सूत्रांनी दिली आहे. 

 ( नक्की वाचा : नागपूरमध्ये ऑडी कारनं धुमाकूळ घालणारा संकेत बावनकुळे अडकणार? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती )
 

भाजप या प्रश्नावर सार्वजनिक रित्या जी अधिकृत भूमिका घेणार आहे, ती वेगळी असणार आहे. महायुतीला विधान परिषदेत असलेले संख्याबळ सध्यातरी एकने कमी करायचे नाही, अशी भाजपची उघड भूमिका असणार आहे. याला, कारण ही तसेच आहे. बावनकुळे यांना विधानसभेत पाठवले तर परिषदेत त्या रिक्त जागेसाठी निवडणूक घेणे काही काळ शक्य नाही. बावनकुळे सध्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातून विधान परिषदेत सदस्य आहेत.