धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आमदार सुरेश धस हे भलतेच आक्रमक झाले आहेत. नागपूरचे हिवाळी अधिवेशन असो की आक्रोश मोर्चा असो प्रत्येक ठिकाणी सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची कोंडी केलेली दिसते. शिवाय त्यांनी अजित पवारांनाही या प्रकरणी निर्णय घ्या. क्या हुवा तेरा वादा असा प्रश्न करत अजित पवारांनाही लक्ष्य केलं होतं. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी पुन्हा एकदा पुढे सरसावले आहेत. त्यांनी सुरेश धस यांच्यावर निशाणा साधत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे महायुतीत नवा वाद निर्माण होतोय की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सुरेश धस हे एका मागून एक धक्कादायक खुलासे करत आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे. महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला भाजप आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील असं विधान राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यावरही सुरेश धस कसे बोलत आहेत? असा सवालही त्यांनी यावेळी केलाय. धस यांच्यावर या आधीही मिटकरी यांनी टीका केली होती. त्यावेळी धस यांनी मिटकरींना बजावले होते. सगळ्यांचा नाद करायचा पण माझा करायचा नाही.
त्यानंतरही मिटकरी यांनी पुन्हा एकदा धस यांना लक्ष्य केले आहे. परभणीतल्या मोर्चातील सुरेश धस यांच्या भाषणावरही मिटकरी यांनी टीका केली आहे. अजित पवारांवर जर कोणी टीका करत असेल तर ती आम्ही सहन करणार नाही. असा इशारा त्यांनी यावेळी सुरेश धसांना दिलाय. मस्साजोग प्रकरणात संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केलीय. पक्षाचीही तिच भूमीका आहे असंही ते या निमित्ताने म्हणाले. या प्रकरणात राजकारण येता कामा नये असंही त्यांनी सांगितलं.
सुरेश धसांना आता मुख्यमंत्र्यांनीच आवर घालावा, अशी मागणी त्यांनी केलीये. तर या प्रकरणात संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांऐवजी विरोधक धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करीत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. या प्रकरणात आता राजकारणाचा वास येत असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, आपल्याला सुरेश धसांच्या कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा गंभीर आरोप ही अमोल मिटकरी यांनी केला आहे.