संतोष देशमुख यांच्या हत्यानंतर बीड जिल्ह्यातील राजकारणाला एक वेगळीच कलाटणी मिळाली आहे. धनंजय मुंडे यांच्या विरोधातलं वातावरण आता चांगलेच तापले आहे. विरोधक धनंजय मुंडे यांच्या विरोधात आक्रमक झालेच आहेत. पण आता स्वपक्षिय ही धनंजय मुंडे यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. भाजप आमदारांनी तर या आधीच मुंडे विरोधात मोर्चा उघडला होता. त्यात आता स्वकियांनीही धनंजय मुंडे यांना लक्ष करत त्यांना थेट मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी मुख्यमंत्री आणि अजित पवारांकडे केले आहे. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी आक्रोश मोर्चाचे बीडमध्ये आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व पक्षाचे नेते यात सहभागी झाले होते. यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंखे यांचाही समावेश होता. यावेळी बोलताना त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येला 19 दिवस झाले. पण त्यांची हत्या करणारे अजूनही मोकाट आहेत. वाल्मिक कराडलाही अटक केली नाही. असं सांगत असताना सोळंखे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
प्रकाश सोळंखे यावेळी म्हणाले, धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री होते. त्यावेळी पंकजा मुंडे सांगत होत्या. धनंजय मुंडे यांनी पालकमंत्रीपद भाड्याने दिलं आहे. ते कोणाला दिलं आहे तर वाल्मिक कराडला दिलं आहे. त्यातून घटनाबाह्य सत्ता केंद्र बीडमध्ये तयार झाले. याच वाल्मिक कराडला त्यामुळे पालकमंत्र्याचे अधिकार मिळाले. त्या जोरावर त्याने पोलिसांवर जरब बसवली. तो कोणतेही आदेश देत होता. त्याच्या आदेशाने हजारो बेगुन्हावर खटले दाखल झाले असा आरोपही या निमित्ताने सोळंखे यांनी केला. गोदावरीत जो वाळू उपसा होतो त्या मागे कोण आहे अशी विचारणाही त्यांनी केली.
वाल्मिक कराडच्या मागे याच धनंजय मुंडे यांनी शक्ती उभी केली. त्यामुळे धनंजय मुंडे हे जोपर्यंत या मंत्रिमंडळात असतील तो पर्यंत संतोष देशमुख केसमध्ये न्यायाची अपेक्षा नाही असंही ते म्हणाले. अशा स्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना विनंती आहे की जोपर्यंत या केसची चौकशी होवून आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत त्यांना मंत्रिपदावरून काढून टाका. त्याच वेळी या प्रकरणात निपक्ष तपास होईल. तो निपक्ष झाला पाहिजे असंही ते म्हणाले. या मागणीसाठी हे पहिलं पाऊल आहे. तर न्याय मिळाला नाही तर या पेक्षाही मोठं आंदोलन उभं केलं जाईल असं ते म्हणाले.
दरम्यान यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही धनंजय मुंडे यांना लक्ष केलं आहे. वाल्मिक कराड हा वाल्या आहे अशा शब्दात त्यांनी हल्लाबोल केला. बीडमध्ये हत्यांचे सत्र सुरू आहे. मर्डर झालेलेही बरेच जण वंजारी आहेत. आणि ते करणारेही वंजारी आहेत असा आरोपही त्यांनी यावेळी केला. बीडचा सत्यानाश जर कुणी केला असेल तर तत्कालीन पालकमत्री आणि पोलिसांनी केला असल्याचा आरोप करत त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर थेट निशाणा साधला. बापू आंधळे मर्डर केसमध्ये वाल्मिक कराडला कुणी वाचवले असा प्रश्न त्यांनी केला. आकाचा बाप कोण आहे हे जनतेला माहित आहे. अटक केलेल्यांची नार्को टेस्ट करा सर्व बाहेर येईल असंही ते म्हणाले.